बदलापूर : पालिका निवडणुकीसाठी महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी आरक्षित प्रभागांव्यतिरिक्तही अनेक महिला आपले नशीब अजामावत आहेत. बदलापूरच्या निवडणुकीत ४७ प्रभागांसाठी असलेल्या १५० उमेदवारांपैकी ७६ महिला तर ७४ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महिला आरक्षण असल्याने राजकारणात सक्रिय असलेल्या बड्या राजकारण्यांनी आपल्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. आरक्षणाचा फटका बसल्याने पुरुष उमेदवार हे खुल्या प्रभागातून आपले नशीब आजमावत आहेत. जे प्रभाग खुल्या वर्गासाठी आहेत, तेथे अनेक पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. असे असले तरी एकूण उमेदवारांमध्ये महिलांचा आकडा हा ५० टककयांच्या वर गेला आहे. पुरुष उमेदवारांना महिला प्रभागात निवडणूक लढविता येत नसली तरी खुल्या प्रवर्गातील प्रभागात पुरुष उमेदवार अपेक्षित असताना तेथेही महिलांचा शिरकाव झालेला दिसत आहे. ५० टक्के आरक्षण असले तरी पालिका सभागृहात महिला नगरसेविकांचा आकडा हा ५५ ते ६० टककयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे पालिकेत महिलांचेच वर्चस्व दिसणार आहे. (प्रतिनिधी)
बदलापूर निवडणुकीत महिला आघाडीवर
By admin | Published: April 10, 2015 11:05 PM