महिलांनो सावधान, गोल्ड क्वीनची तुमच्यावर नजर

By Admin | Published: February 21, 2016 02:17 AM2016-02-21T02:17:48+5:302016-02-21T02:17:48+5:30

लग्नसमारंभ, बड्या पार्ट्या आणि ब्यूटीपार्लरमधून फिरणारी प्रभावी व्यक्तिमत्त्वाची तरुणी कमी किमतीत गोल्ड कॉइन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत आहे.

Women, beware, Gold Queen looks at you | महिलांनो सावधान, गोल्ड क्वीनची तुमच्यावर नजर

महिलांनो सावधान, गोल्ड क्वीनची तुमच्यावर नजर

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे,  मुंबई
लग्नसमारंभ, बड्या पार्ट्या आणि ब्यूटीपार्लरमधून फिरणारी प्रभावी व्यक्तिमत्त्वाची तरुणी कमी किमतीत गोल्ड कॉइन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत आहे. त्यामुळे या तरुणीपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी महिलांना केले आहे. माधवी किशोर टेंभे (४०) असे या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
गिरगावच्या मराठमोळ्या कुटुंबातील माधवी पदवीधर आहे. तिचे वडील मंत्रालयात कामाला आहेत. उच्चभ्रू राहणीमान असलेल्या माधवीचे इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असतानाही तिला तिच्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे झटपट पैसा कमविण्यासाठी तिने सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्या महिलांना टार्गेट करण्याचे ठरविले. कस्टम अथवा जेट एअरवेजमध्ये कामाला असल्याचे सांगून तेथे जप्त केलेली सोन्याची नाणी खूपच कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून ती महिलांची फसवणूक करते.
आतापर्यंत दादर, वरळी, सायन कोळीवाडा भागातील तब्बल १० ते १२ महिलांना तिने तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी, खामकर, अंमलदार सावंत, राठोड, ठाकूर, टेंभकर या पथकाने अधिक तपास सुरू केला. दरम्यान माधवी कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून तिला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत तिच्याकडून तब्बल पावणेसात लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
त्यात लग्नसमारंभ, पार्ट्या, पार्लरमध्ये जाऊन याच ओळखीचा वापर करून ती अन्य महिलांशी संपर्क साधत होती. सावज हाती आले की कस्टममध्ये जप्त केलेली नाणी सराफाच्या मदतीने दहा गॅ्रमला अवघ्या १८ ते २० हजार या किमतीत देण्याचे आमिष ती महिलांना दाखवत असे. या महिलांना विश्वास बसावा म्हणून त्यांना सोबत घेऊन ती सराफाच्या दुकानात जायची. मात्र तेथे संबंधित महिलेला सराफाशी संवाद साधू देत नसे. नाणी खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे संबंधित महिलांना भरावयास सांगत होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती नाणी मिळतील, असे आश्वासन ती देत असे. मात्र रक्कम हाती पडल्यावर संबंधित महिलेशी संपर्क तोडून ती पसार व्हायची.

प्रभावी व्यक्तीमत्त्वाचा फायदा
माधवीविरोधात जम्मू काश्मीरसह खेरवाडी, टिळकनगर, नौपाडा, एमआरए मार्गसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा फायदा घेत माधवी बड्या धेंडांशी ओळख करून घेत असे.
आतापर्यंत अशा प्रकारे तिने अनेकांना गंडा घातला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.

Web Title: Women, beware, Gold Queen looks at you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.