Join us

महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात: एकनाथ शिंदे, शिवदुर्गा महिला संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 9:51 AM

मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला आघाडीला यावेळी प्रोत्साहन देत आगामी लोकसभा निवडणुकीचे शंख फुंकले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समाजाला आकार देण्याचे काम महिला करतात. एका वेळी अनेक भूमिका पार पाडणाऱ्या महिलाच समाजात क्रांती देखील घडवून आणू शकतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी शिवसेना महिला सेनेचे ‘शिवदुर्गा महिला संमेलन’ पार पडले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला आघाडीला यावेळी प्रोत्साहन देत आगामी लोकसभा निवडणुकीचे शंख फुंकले.  यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला उपस्थित होत्या. राज्यात महिला सुरक्षा अभियान सरकार राबवत आहे. १०० कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली आहे. मुंबई आणि ठाण्याच्या आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवास महिलांसाठी ५० टक्के सवलत दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करत असल्याचे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्ष निराशेच्या वातावरण गेले. सण उत्सवांवर बंदी लादली होती. प्रकल्प बंद पडले होते. मात्र महायुती सरकार सत्तेत येताच, सर्व जीवन सुखकर झाले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झाला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांची खुर्ची काटेरी असे म्हणतात. काहींनी त्याचा वापर केला नसल्याचा अप्रत्यक्ष चिमटाही त्यांनी काढला.  सरकारचे लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले. सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमातून ४ कोटी लाभार्थ्यांनी फायदा घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

 

टॅग्स :एकनाथ शिंदे