बाळाबरोबर सेल्फीसाठी महिलांना फिगरची काळजी
By admin | Published: May 27, 2015 12:23 AM2015-05-27T00:23:53+5:302015-05-27T00:23:53+5:30
बाळाबरोबर सेल्फी काढण्यासाठी बांधा कमनीय असावा, असे ८२ टक्के महिलांना वाटत असल्याचे नेल्सन या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
मुंबई : बांधा कमनीय असावा, असे महिलांना वाटत असते. पण आई झाल्यावर बाळाबरोबर सेल्फी काढण्यासाठी बांधा कमनीय असावा, असे ८२ टक्के महिलांना वाटत असल्याचे नेल्सन या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. मातृत्वाची चाहूल लागल्यावर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. पण काळानुरूप यातही बदल होत असल्याचे नेल्सनने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
मूल होणार आहे, हे दाम्पत्याला समजते तेव्हा त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. यापुढे आयुष्यात होणारे बदल लक्षात घेऊन नियोजनाची सुरुवात होते. जीवनशैली आणि काळात झालेल्या बदलांमुळे मूल होणाऱ्या दाम्पत्याची मानसिकता बदललेली असल्याचे या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आई होणार असल्याचे समजताच महिला बाळासाठी कपडे विणणे, दुपटी शिवण्याची तयारी करायच्या. पण काळ बदलला तसे विचारसरणी बदलली. आता यात स्वत:सह बाळाच्या काळजीचा अग्रक्रमाने विचार होत आहे.
सेल्फीच्या क्रेझमुळे बाळाबरोबरच्या सेल्फीत आपणही सुंदर दिसावे, यासाठी बांधा कमनीय दिसावा, असे ८२ टक्के महिलांना वाटते. तर लग्नाच्या वेळी बायको जशी होती तशीच ती प्रसूतीनंतरही दिसावी, असे ९२ टक्के नवऱ्यांना वाटते.
बायको ‘यम्मी मम्मी’ असावी, असेही नवऱ्यांना वाटते. नवऱ्यांना गर्भारपणाच्या काळात बायकोच्या कमनीय बांध्याविषयी काळजी वाटत असल्याचेदेखील यात समोर आले आहे. कारण, ८२ टक्के नवरे गर्भारवस्थेतील बायको सुंदर दिसावी, तिला प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क दिसू नयेत, म्हणून काळजी घेत असल्याचे दिसून आले. ९६ टक्के पती हे गर्भारवस्थेतील बायकोची जास्तच काळजी घेत असल्याचेही दिसून आले.
बाळाची काळजी असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून गर्भारवस्थेत महिला नैसर्गिक प्रोडक्ट वापरण्यावर भर देतात. गर्भारवस्थेत महिलांचे वजन वाढते. वजन वाढल्याने भावनिक व्हायला होते, असे ७५ टक्के महिलांनी सांगितले. सिझेरियन झाल्यास कितीही काळजी घेतली, तरी त्वचा पहिल्यासारखी होत नाही, अनेकदा स्ट्रेच मार्क राहतात. यामुळे ७५ टक्के महिला घाबरतात. याउलट घाबरायला झाले तरीही ७८ टक्के महिला आपण घाबरलेले नसल्याचे दाखवतात.