दुसरा जन्म देण्यासाठी ‘ती’च येते पुढे; पुरुषांची अवयवदानात पिछाडी
By संतोष आंधळे | Updated: March 5, 2025 09:37 IST2025-03-05T09:36:50+5:302025-03-05T09:37:45+5:30
कुटुंबातील सदस्यांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी प्रामुख्याने पुढे येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

दुसरा जन्म देण्यासाठी ‘ती’च येते पुढे; पुरुषांची अवयवदानात पिछाडी
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय कारणामुळे कुटुंबातील सदस्याचे अवयव निकामी झाल्यानंतर बहुतांशवेळा घरातील महिला सदस्य अवयवदान करण्यासाठी पुढे आल्याचे दिसून येत आहे. त्यात आई, बहीण, आजी, बायको, मावशी, आत्या यांचा समावेश असतो. कुटुंबातील सदस्यांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी प्रामुख्याने पुढे येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
राज्यात अवयव प्रत्यारोपणाचे नियमन स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) संस्थेमार्फत केले जाते. मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या चार विभागीय अवयव प्रत्यारोपण संस्था या प्रक्रियेचे काम पाहतात.
वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रत्यारोपण जिवंतपणी अवयवदानात किडनी आणि यकृताचा भाग (लिव्हर) यांचा समावेश होतो. हे अवयव निकामी झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यामध्ये जवळच्या नात्यातील (कायद्यात नात्याची व्याख्या सांगितली आहे) व्यक्तीने अवयव द्यावा किंवा विभागीय अवयव प्रत्यारोपण संस्थेच्या प्रतीक्षा यादीवर नोंदणी केली जाते.
२ हजार महिलांचे किडनीदान
‘सोटो’च्या माहितीनुसार, २०२२ ते २४ या तीन वर्षांत जिवंतपणी अवयवदान केलेल्यांमध्ये पुरुषांनी ७७०, तर महिलांनी २,३८९ किडनीदान केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत पुरुषांनी ३८०, तर महिलांनी ७८२ लिव्हर दान केले.
रुग्णाची आई कशाचाही विचार न करता सर्वप्रथम पुढे येते. त्यानंतर बहीण, बायको, आजी, मावशी, आत्या पुढे येतात. किडनीदानात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या तिपटीने अधिक आहे. - डॉ. श्रीरंग बिच्चू, किडनी विकारतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल
महिला अधिक कुटुंबवत्सल असतात. नात्यातील ओलावा त्या अधिक प्रमाणात जपतात. माझ्या गेल्या १० वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी हेच बघितले आहे की घरात अवयवदान करण्याची वेळ येते तेव्हा महिला पुढे असतात. - डॉ. गौरव चौबळ, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, मॅक्स नानावटी हॉस्पिटल