Join us

पतीने सोनसाखळी विकल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:14 AM

मुंबई : पतीने सोनसाखळी विकली म्हणून शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना अँटॉप हिल परिसरात घडली. यात महिनाभराने वडाळा टी. टी. ...

मुंबई : पतीने सोनसाखळी विकली म्हणून शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना अँटॉप हिल परिसरात घडली. यात महिनाभराने वडाळा टी. टी. पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अँटॉप हिल भागात राहणाऱ्या जैनाब इब्राहिम सैफन हिरापुरी परिसरातील एका शाळेत शिक्षिका होत्या. ८ वर्षांपूर्वी इब्राहिमसोबत त्यांचा विवाह झाला. तो बेरोजगार असून, त्याला दारूचे व्यसन जडले होते. याच दरम्यान जैनाबने माहेर गाठले. १ जुलै रोजी इब्राहिमने तिची सोनसाखळी घेत लवकरच आणून देतो, असे सांगितले. थोड्या वेळाने सोनसाखळी जैनाबला आणून दिली.

दोन महिन्यांनी जैनाबच्या आईला सोनसाखळीबाबत संशय आला. तिने सराफाकडे सोनसाखळीबाबत विचारणा केली, तेव्हा ती बनावट असल्याचे त्यांना समजले. इब्राहिमच्या प्रतापामुळे जैनाबला धक्का बसला. तिने इब्राहिमकडे सोनसाखळी परत देण्याबाबत तगादा लावला. सोनसाखळी दे, नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र, इब्राहिमने त्याकडे दुर्लक्ष केले.

१५ सप्टेंबर रोजी तिने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तत्काळ सायन रुग्णालयात नेले. याबाबत इब्राहिमला समजताच, १६ सप्टेंबर रोजी तो रुग्णालयात आला आणि तिची प्रकृती गंभीर असतानाही तिला सोबत घेऊन गेला. १७ सप्टेंबर रोजी तिची प्रकृती खालावल्याने इब्राहिमने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जैनाबचा भाऊ वसीम याने वडाळा टी. टी. पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर गुरुवारी त्याला अटक केली.

टॅग्स :गुन्हेगारी