Join us

‘नॉन स्टॉप मुंबई’ साठी राबत आहेत महिला अभियंता ...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:18 PM

हे आव्हान सक्षमपणे पेलण्यासाठी पालिकेतील १८ महिला अभियंत्यांची टीम सातत्याने कार्यरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, हे मोठे आव्हान असते. हे आव्हान सक्षमपणे पेलण्यासाठी पालिकेतील १८ महिला अभियंत्यांची टीम सातत्याने कार्यरत आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागासाठी १८ महिला अभियंता म्हणून कार्यरत असून त्यात मुंबई शहरात १ दुय्यम अभियंता, पूर्व उपनगरात ९ दुय्यम अभियंता, पश्चिम उपनगरात ७ दुय्यम अभियंता कार्यरत आहेत. 

या शिवाय पश्चिम उपनगरात १ सहायक अभियंता अशी एकत्रित १८ अभियंत्यांची टीम काम करीत आहे. ही टीम नालेसफाईपासून ते भरतीच्या काळात अगदी उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) वर सेवा बजावण्यापर्यंत विविध पातळ्यांवरील पावसाळापूर्व कामांची जबाबदारी पार पाडत आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागात अभियंता म्हणून कार्यरत असताना मुंबईकरांसाठी पुरूष, महिला असा कोणताही भेद न करता एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत असून त्याचा आम्हाला अभिमान आहे, अशा प्रतिक्रिया या महिला अभियंत्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

साठवण टाक्यांमुळे दिलासा 

हिंदमाता परिसर जलमुक्त राखण्यासाठी यंदा प्रमोद महाजन उद्यान येथे पाणी साठवण टाक्यांच्या प्रकल्पाकरिता पर्जन्य जलवाहिन्या विभागात सहायक अभियंता म्हणून स्नेहल पाटील कार्यरत आहेत. मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात या साठवण टाक्यांमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांना व्यक्त केला.

नागरिकांनी जबाबदारी ओळखावी

मुंबईतील नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा न टाकता आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वागणुकीतील एक छोटासा बदल हा आगामी काळातील समस्या वाढवण्यापासून दिलासा देऊ शकतो, असे टी विभागातील दुय्यम अभियंता रश्मी उभारे यांनी सांगितले. नव्या पिढीच्या महिला अभियंत्यांना महानगरासाठी हे काम किती महत्त्वपूर्ण आहे, ही बाब समजून या विभागासाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईकरांनीही जबाबदारी घ्यावी

-  मुंबईतील नालेसफाई म्हणजे ठिकठिकाणी पोहोचून नाल्यातील गाळ काढणे हे आव्हानात्मक काम असून अशावेळी मुंबईकरांनी आपली जबाबदारी ओळखून ती व्यवस्थित पार पाडायला हवी अशी अपेक्षा या महिला अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. 

- अनेकदा नाल्यातून गाळ किंवा तरंगता कचरा काढण्याचे काम सुरू असतानाही नजरेदेखत नागरिक बेजबाबदारपणे नाल्यात कचरा टाकतात. 

- या ऐवजी नागरिकांनी कचरा संकलन व्यवस्थेचा उपयोग केला तर आमचे प्रयत्न सार्थकी लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

- अनेकदा गाद्या, सोफा आणि चक्क दुचाकी नाल्यात फेकल्याचे आढळले आहे. अशा वस्तू उदंचन केंद्र, पातमुख किंवा पूरप्रतिबंधक दरवाजे अशा ठिकाणी अडकून मोठी समस्या उभी राहते आणि त्याचा फटका संपूर्ण परिसराला बसतो. 

- त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन या अभियंत्यांनी केले आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊस