मुंबई : गर्दीच्या वेळी सीएसटीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर आणि विना अपघात व्हावा यासाठी मेल-एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. महिला प्रवाशांना सीएसटीकडे जाणाऱ्या तीन एक्सप्रेसमधून ही मुभा मिळेल.हा प्रवास करण्यासाठी रेल्वेकडून कूपन पध्दतीने आकारणी करण्यात येणार असल्याची माहीती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. डोेंबिवलीकर भावेश नकाते याचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची दखल घेत गर्दीमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र यात थोडा बदल करत महिला प्रवाशांना प्राधान्य देत गर्दीच्या वेळी एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची त्यांनाच मुभा देण्याचे नमूद केले आणि हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला होता. ठाणे आणि कल्याणहून प्रवास करणाऱ्या महिलांना सेकंड क्लास पासावर ३0 रुपये, फर्स्ट क्लाससाठी (ठाणे व कल्याण) १0 आणि २0 रुपयांचे कूपन असेल. महिन्याला तीन हजार कूपन्सचे वाटप करण्यात येणार आहे. दहा दिवस आधीच हे कूपन महिला प्रवाशांना तिकिट खिडक्यांवर उपलब्ध करुन दिले जातील. पहिले तीन दिवस महिलांसाठी कूपन उपलब्ध असतील. महिला प्रवाशांनी त्याचा लाभ न घेतल्यास त्यानंतर कूपन ज्येष्ठ नागरीकांना दिले जातील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. अशाप्रकारची पहिलीच सेवा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु होणार असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
महिलांना मेल-एक्स्प्रेसमधून ‘लोकल’प्रवासाची मुभा
By admin | Published: January 21, 2016 3:43 AM