मनोज गडनीस, मुंबई : मुंबईनजिकच्या मीरा रोड येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याने शरीरात सोने लपवत केलेल्या तस्करीचा भांडाफोड विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे एक कोटी ३० लाख रुपये मूल्याचे सोने सापडले आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील जेद्दा येथून जबीना मोईस अदनानवाला आणि मोईस अदनानवाला हे दाम्पत्य मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे अधिकाऱ्यांना वाटल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. मात्र, ज्यावेळी हे दाम्पत्य ग्रीन चॅनल ओलांडत बाहेर जाण्याच्या तयारीत होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले. चौकशी दरम्यान त्यांनी गुदद्वारात चार कॅप्सूलमध्ये सोन्याच्या गोळ्या करून त्या लपविल्याची माहिती दिली.
वैद्यकीय उपचारांती त्या दोघांच्या शरीरातून या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्या सोन्याचे वजन तब्बल २ किलो ६०० ग्रॅम इतके होते. मात्र, आपण ही सोन्याची तस्करी स्वतःसाठी केली नसून याकरिता आपल्याला २५ हजार रुपये मिळाल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.