लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलांनी स्वकर्तृत्वाने उच्च स्थान गाठले आहे. कुटुंब व कार्यालय यात कर्तव्याचे संतुलन साधत आर्थिक स्वातंत्र्य मिळवून त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत, असे मत मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा तनुजा कंसल यांनी मांडले.
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने २५ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आणि रजोनिवृत्तीबाबत जागरूकतेसाठी चर्चासत्राचे आयोजन केले हाेेते. यावेळी कंसल यांनी सांगितले की, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना आपले दैनंदिन कामकाज व्हर्च्युअल मीटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या नवीन कल्पनांसह करत आहे. संघटनेने रेल्वे कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायजर आणि किराणा किट इत्यादींचे वाटप केले आहे.
कंसल यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महिला प्रतीक्षालयाला भेट दिली. महिला रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले. महिला प्रतीक्षालयात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आल्याचे सांगितले.
प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजू हजारी यांनी महिला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेसंदर्भातील सादरीकरण केले. महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
.....................................................................