अनिकेत घमंडी, डोंबिवलीडोंबिवलीकर महिलांनी ऐन गर्दीच्यावेळी कल्याण लोकल पकडून उलटा प्रवास केला आणि गाडीतील जागा अडवल्याने पित्त खवळलेल्या कल्याणमधील महिलांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली आणि त्यांना जागेवरून उठवण्याकरिता झटापट केली. याबाबत डोंबिवलीमधील महिलांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आधीच बसून गेलेल्या डोंबिवलीकर महिलांना पाहताच कल्याणच्या महिलांचा पारा चढला. आपल्या जागा अडवलेल्या महिलांना उठण्याकरिता त्या दमदाटी व शिवीगाळ करु लागल्या. काही महिलांनी तर बसलेल्या महिलांच्या अंगावर धावून जात त्यांना जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यात झटापट झाली.सध्या नवरात्रौत्सव सुरु असून महिला रोजच्या रंगानुसार कधी लाल तर कधी पिवळ््या साड्या परिधान करतात. मात्र लोकलमधील ही फ्रीस्टाईल कुस्ती पाहून महिलांचा वेगळाच रंग त्याच डब्यातील अन्य महिला व पुरुष प्रवाशांना पाहायला मिळाला. कल्याणमधील महिलांनी दहशत, दडपशाही केल्याची माहिती त्याच लोकलमधून प्रवास करणाऱ्या लता अरगडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ज्या डोंबिवलीकर महिलांना हा कटू अनुभव आला त्यातील काहीजणी मंत्रालयात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अरगडेंनी या घटनेसंदर्भात तात्काळ लोहमार्ग पोलीसांसह हेल्पलाइनशी संपर्कस साधत घटनेची माहिती दिली. ही लोकल डोंबिवली स्थानकात आल्यानंतर महिला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. मात्र बसून प्रवास करण्याकरिता उलटा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता हा अनुभव रोजचा असून यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी डोंबिवलीतील महिला प्रवाशांनी लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असून दादागिरी करणाऱ्या महिलांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ‘लोकमत’कडे केली. बुधवारी सकाळी ८.४७ ची मुंबईकडे जाणारी जलद लोकल फलाट क्र. पाचवर आली तेव्हा खच्चून भरलेल्या या लोकल मध्ये प्रवेश करण्याकरिता धडपडणाऱ्या काही महिला लोकलमधून पडल्या. ही घटना पाहताच अनेकांनी आरडाओरडा केल्याने मोटारमनने लोकल थांबवली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या गोंधळात ती लोकल पंधरा मिनिटे खोळंबली. त्या पाठोपाठ येणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात डोंबिवलीकर महिला विरुद्ध कल्याणकर महिला यांच्यात जागेवरून संघर्ष झाला.
कल्याणमधील महिलांचा झोंबाझोंबीचा आगळा रंग
By admin | Published: October 06, 2016 3:21 AM