Join us

चेंबूर येथे अंगावर झाड कोसळून महिला ठार, पालिकेची ‘ढकलेगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:45 AM

चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून एक महिला प्रवासी ठार झाली. चेंबूरमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे

मुंबई : चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून एक महिला प्रवासी ठार झाली. चेंबूरमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. याआधी जुलै महिन्यातदेखील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेवर माडाचे झाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे धोकादायक स्थितीत उभी असलेली झाडे मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.चेंबूरमध्ये डायमंड गार्डन परिसरातील बस थांब्यावर आज सकाळी ११च्या सुमारास शारदा सहदेव घोडेस्वार (४५) बसची वाट पाहत होत्या. बराच वेळ बस नसल्याने त्या जवळच्या झाडाशेजारील बाकावर बसल्या. तेव्हा अचानक झाड अंगावर पडून त्या जबर जखमी झाल्या. शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पांजरपोळ येथे राहणाºया शारदा चेंबूर येथे घरकाम करीत होत्या. तिथल्याच ड्रीमलँड सोसायटीत घरकाम आटपून त्या बाहेर पडल्या होत्या. मात्र सोसायटीबाहेरील गुलमोहराच्या झाडाने त्यांचा बळी घेतला.गेल्या वर्षभरात या झाडाबाबत कोणतीच तक्रार आलेली नव्हती. पावसाळा आणि गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने याची तपासणी केली होती. ४० फूट उंच आणि २२ फूट रुंद असलेले हे झाड चांगल्या स्थितीत होते, असा दावा पालिकेने केला आहे.

टॅग्स :मुंबई