मुंबई : मालाड पश्चिम मढ येथे समुद्रकिनारी ब्रिटिशांच्या काळातील भारतीय हवाई दलाचे केंद्र आहे. आजच्या राखी पोर्णिमेचे औचित्य साधून मढ कोळीवाड्यातील सुमारे 20 कोळी महिलांनी मढ येथील या केंद्रात दुपारी 12 वाजता जाऊन हवाई दलातील भारतीय सैनिकांना राखी बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी आमच्या घरीच आमच्या बहिणी आम्हाला राखी बांधत आहे, असे भावपूर्ण उद्गार सैनिकांनी काढले.
याचबरोबर, तुम्ही देशाचे रक्षण करतात आणि तुमच्यामुळे आम्ही बहिणी सुखाने जगू शकतो, असे भावनिक उद्गार आमच्या कोळी महिलांनी काढल्याची माहिती मच्छिमार नेते व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
यावेळी, चंदा दत्ताराम कोळी, राजेश्री अंकूश कोळी, शालिनी विजय कोळी, मानक विद्याधर कोळी तसेच इतर कोळी महिला व किरण कोळी व उपेश कोळी आदी उपस्थित होते.