Join us

शिर्डी, नाशिकमध्ये मुंबईच्या महिला फोडणार हंडी; जोरात सराव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 3:30 AM

प्रबोधन कुर्ला शाळेतील गोरखनाथ महिला दहीहंडी पथक जन्माष्टमीनिमित्त शिर्डी आणि नाशिक जेल रोड भागात पाच थर लावून महिला दहीहंडी फोडणार आहेत. यासाठी महिला पथकाचा जोरात सराव सुरू आहे.

मुंबई : प्रबोधन कुर्ला शाळेतील गोरखनाथ महिला दहीहंडी पथक जन्माष्टमीनिमित्त शिर्डी आणि नाशिक जेल रोड भागात पाच थर लावून महिला दहीहंडी फोडणार आहेत. यासाठी महिला पथकाचा जोरात सराव सुरू आहे.यंदा शिर्डीमध्ये साईबाबा जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी देशातील पहिल्या महिला गोविंदा पथकाची ख्याती असलेल्या गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाला निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी गोरखनाथ महिला पथक गेल्या काही दिवसांपासून तीन थर लावून सराव करत आहेत. त्यांना मंडळाचे संस्थापक भाऊ कोरगावकर आणि अध्यक्षा शलाका कोरगावकर, प्रशिक्षक बंडू कांबळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.महिलांच्या अग्रथरावर सलामी देण्यासाठी चतुर्थी म्हात्रे, अदिती शिंदे, हर्षला पाटील, अदिती सांडगे यांच्यासह वेदांती म्हात्रे, श्रावणी शिंदे, शुभांगी पाटील, राणी काळे, नीलम जगताप, रेश्मा जाधव, सुचिता महाडिक, पूनम जगताप, प्रिया जानकर, स्वाती पवार, रसिका गावंड, किरण काव्या आदींसह प्रशिक्षक श्रीधर राजे, शशी कडू, विलास जानकर, नीता आंबोकर, शिंदेमामा, विजय पाटील, जयेश हांडे आदी मंडळी सरावासाठी विशेष कार्यरत आहेत.पहिले महिला दहीहंडी पथक१९९६ मध्ये प्रथम गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाने मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला. राज्यामध्ये शेकडो महिला गोविंदा पथके आता जन्माष्टमीचा आनंद लुटत आहेत. गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाने रोख पुरस्कारापेक्षा सणाचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करून गेली २२ वर्षे सातत्य राखले आहे.मागील काही वर्षांपासून महिला पथकाने महाराष्ट्र राज्याच्या सणाची ओळख थेट द्वारका, उडपी, उज्जैन, मथुरा, कर्नाटक, अमृतसर, वाराणसी येथील नागरिकांना करून दिली आहे. तेथे पाच थरांचे मनोरे रचून महिलांनी दिलेल्या सलामीने टाळ्यांनी आसमंत दुमदुमला.

टॅग्स :दही हंडीमुंबई