मुंबई : मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून रोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. हे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत महिलांना लोकल प्रवास नकोसा होऊ लागला आहे. विनयभंग, अश्लील हावभाव याविरोधात तक्रारी वाढत आहेत. पाच वर्षांत अशाप्रकारची १४० प्रकरणे रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) दाखल झाली आहेत. गेल्या वर्षभरात महिलांच्या छेडछाडीच्या ५५ घटना घडल्या असून, त्यापैकी ४८ प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्थात ही केवळ नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आहे. प्र्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे प्रमाण यापेक्षा बरेच मोठे असण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून लाखो प्रवासी प्रवास करतात. यात मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांचाही समावेश असतो. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबाही आहे. मात्र लोकल प्रवास तसेच प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहताना किंवा पादचारी पुलावरून जाताना होणाऱ्या विनयभंगाचे प्रमाण मोठे आहे. कधी कधी विनयभंग, छेडछाड होत असताना अन्य प्रवासी महिलेला कोणतीही मदत करीत नाहीत, केवळ बघ्याची भूमिकाच घेतात. काही महिला या छेडछाडीला विरोध करून पोलिसांकडे तक्रार करतात. २०१० मध्ये विनयभंगाच्या १५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१४ मध्ये याच तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, ५५ तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अश्लील हावभाव केल्याच्या ३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून महिला तक्रार करण्याची हिंमत दाखवित असल्या तरी तुलनेने त्याचे प्रमाण कमी आहे. असल्या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
लोकलमध्ये महिला प्रवासी असुरक्षित
By admin | Published: May 25, 2015 2:34 AM