महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास; ‘लोकमत सखी मंच’चा राैप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 08:10 AM2024-09-06T08:10:26+5:302024-09-06T08:11:04+5:30

मुंबई -  ‘ लोकमत’ महिलांसाठी राबवीत असलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. महिला शक्तीच देशाला मजबूत बनवू शकते. नारीशक्तीला जागृत ...

Women power alone can make country strong, President Draupadi Murmu believes; A unique initiative for women on the silver jubilee year of Lokmat Sakhi Manch | महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास; ‘लोकमत सखी मंच’चा राैप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी अनोखा उपक्रम

महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास; ‘लोकमत सखी मंच’चा राैप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी अनोखा उपक्रम

मुंबई -  ‘लोकमत’ महिलांसाठी राबवीत असलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. महिला शक्तीच देशाला मजबूत बनवू शकते. नारीशक्तीला जागृत करणे व तिची प्रगती होण्यासाठी पावले उचलणे याची सध्या सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले. ‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून महाराष्ट्रात महिलांसाठी चालविण्यात येणारे विभिन्न उपक्रम हे त्यांच्या विकासासाठी अतिशय उपयोगी आणि उत्साहवर्धक आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

लोकमत सखी मंचच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समाजात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक, प्रतिनिधिक महिलांची मुंबईतील राजभवन येथे राष्ट्रपतींसोबत गत मंगळवारी विशेष भेट घडवून आणण्यात आली. यावेळी सखींशी संवाद साधताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘लोकमत सखी मंच’सारखे व्यासपीठ ही आजच्या काळाची गरज आहे. महिला सुरक्षित, सुखी, प्रसन्न असतील तर घर, कुटुंब, समाज व देश हे उत्तम प्रगती करू शकतील. महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करून ‘लोकमत’ने चांगले कार्य केले आहे. 

याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी सांगितले की, ज्योत्स्ना दर्डा यांनी स्थापन केलेला ‘लोकमत सखी मंच’ हे महिलांचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. या मंचच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा आशीर्वाद मिळाला, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या महिलांना या भेटीतून प्रेरणा मिळेल. येथे आलेल्या महिलांनी आपापल्या क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांपैकी एक महिला सदस्य ‘पद्मश्री’ने सन्मानित झाल्या आहेत, असे डॉ. दर्डा यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर राष्ट्रपती पुन्हा म्हणाल्या की, स्त्री शक्तीला जागृत करणे गरजेचे आहे. तरच अवघा समाज सशक्त बनू शकेल. डॉ. दर्डा पुढे म्हणाले की, आजची स्त्री आत्मनिर्भर बनण्यासाठी संघर्ष करीत आहे. महिला विविध क्षेत्रांत मौलिक योगदान देत आहेत. महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी ‘लोकमत सखी मंच’ प्रयत्नशील आहे. याप्रसंगी वरिष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने जारी केलेले विशेष नाणे डॉ. दर्डा यांनी राष्ट्रपती मुर्मु यांना भेट दिले. 

महिलांकडून होतो कुटुंब, समाजाचा विकास : आशू राजेंद्र दर्डा
या समारंभात आशू राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, ‘लोकमत सखी मंच’च्या तीन लाख महिला सदस्य असून, त्या एकमेकांच्या सहकार्याने कुटुंब व समाजाचा विकास व प्रगती साधत आहेत.
भगवान बुद्धांच्या पेंटिंगचे राष्ट्रपतींकडून मुक्तकंठाने कौतुक
पेन आर्टिस्ट आणि फोटोग्राफर रचना दर्डा यांनी बनविलेले भगवान बुद्ध यांचे पेंटिंग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेट देण्यात आले. राष्ट्रपतींनी हे पेंटिंग पाहिले. त्यातील बारकाव्यांची नोंद घेत राष्ट्रपतींनी पेंटिंगची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 
महिलांनी तयार केलेली हॅंडलूमची साडी राष्ट्रपतींना भेट
पूर्वा दर्डा कोठारी यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हँडलूम कॉर्पोरेशनमधील महिलांनी तयार केलेले हँडलूमची साडी राष्ट्रपतींना भेट दिली. त्यावेळी पूर्वा यांना राष्ट्रपतींनी स्नेहभावाने विचारले की, आपण काय करता? त्यावर पूर्वा यांनी उत्तर दिले की, माझी इंट्रिया ज्वेलर्स नावाची कंपनी आहे. त्याच्या माध्यमातून मी ज्वेलरी डिझाइन करते. या दागिन्यांचे प्रदर्शन मी महाराष्ट्रातील लहान-मोठ्या शहरांत आयोजित करते. मुंबई शहरातही माझे स्वत:चे बुटिक आहे. हे ऐकताच राष्ट्रपती मुर्मु यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Web Title: Women power alone can make country strong, President Draupadi Murmu believes; A unique initiative for women on the silver jubilee year of Lokmat Sakhi Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.