नागपाड्यातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महिलांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:44 AM2020-02-03T04:44:40+5:302020-02-03T06:24:32+5:30
एका गटाने माघार घेतल्यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात नागपाडा येथे महिलांच्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये रविवारी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली. शनिवारी एका गटाने या आंदोलनाला मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर काही महिला परत गेल्या होत्या. मात्र आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने महिला मोठ्या संख्येने पुन्हा यामध्ये सामील झाल्या. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाच्या समन्वय समितीची सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक होणार असून त्या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
रविवारी मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या महिलांनी घोषणाबाजी करत या कायद्याला विरोध केला. स्थानिक तरुणांच्या एका गटाने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला महिलांनी विरोध केला. रविवारी समन्वय समितीच्या बैठकीत आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीचे निमंत्रक मोहम्मद नसीम सिद्दिकी, आमदार अबू आसिम आझमी, अमीन पटेल, रईस शेख, माजी आमदार युसुफ अब्राहनी, फय्याज खान, मुबीन कुरैशी व पाच महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. या बैठकीत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर गृहमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला पोलीस आयुक्त व इतर पोलीस अधिकारीदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सिद्दिकी यांनी दिली.
नागपाडा येथील आंदोलनाला पोलिसांची वाढीव परवानगी मिळाली तर ठीक अन्यथा शुक्रवारनंतर झुला मैदानात हे आंदोलन करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असे आश्वासन मिळावे ही मागणी व तसा विधिमंडळात ठराव करण्याची मागणी समिती सोमवारी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये यासाठी समिती आग्रही आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार!
रात्री उशिराने आंदोलकांनी परवानगी नसतानाही स्पीकरचा वापर केल्याने पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलकांनी पोलिसांसोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली, पण पोलिसांनी शांततेत परिस्थिती हाताळली. मात्र, परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आणि आम्ही ती करणार असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालीनी शर्मा यांनी दिली.