लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला दिनानिमित्त महिलांनी मध्य रेल्वेची धुरा सांभाळली. भारतीय रेल्वेची प्रथम महिला लोको पायलट आणि आशियातील प्रथम महिला ट्रेनचालक सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात सर्व महिला दल आणि मंजुळा इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-लखनौ विशेष गाडी चालविली.
प्रथम मोटरवुमन मुमताज काझी आणि उपनगरी गार्ड श्वेता घोणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)येथून ०८.४९ वाजता सुटणारी कल्याण लोकल तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून ०९.०६ वाजता पनवेलसाठी सुटणारी उपनगरी गाडी मनीषा म्हस्के मोटरवुमन यांनी चालविली. या व्यतिरिक्त पनवेल ते कल्याणकडे जाणारी मालगाडी लोको पायलट तृष्णा जोशी, सहायक लोको पायलट सेल्वी नादर आणि गुड्स गार्ड सविता मेहता यांनी चालविली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिवणयंत्र, हलके मोटर वाहन चालविण्याचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना स्टाफ बेनिफिट फंड, प्रमाणपत्र दिले.
पुरस्कार देऊन महिलांच्या कार्याचा गाैरवमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला. तर महिला कर्मचाऱ्यांनी रेल्वेची सेवा बजावताना आलेले विविध थरारक अनुभव उपस्थितांना सांगितले.