Join us

महिलांनी सांभाळली मध्य रेल्वेची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:07 AM

सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात महिला दिनानिमित्त चालवली मुंबई-लखनौ गाडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला दिनानिमित्त महिलांनी मध्य रेल्वेची ...

सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात महिला दिनानिमित्त चालवली मुंबई-लखनौ गाडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिला दिनानिमित्त महिलांनी मध्य रेल्वेची धुरा सांभाळली. भारतीय रेल्वेची प्रथम महिला लोको पायलट आणि आशियातील प्रथम महिला ट्रेनचालक सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात सर्व महिला दल आणि मंजुळा इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-लखनौ विशेष गाडी चालविली.

प्रथम मोटरमन मुमताज काझी आणि उपनगरी गार्ड श्वेता घोणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.४९ वाजता सुटणारी कल्याण लोकल तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.०६ वाजता पनवेलसाठी सुटणारी उपनगरी गाडी मनीषा म्हस्के मोटरवुमन यांनी चालविली. या व्यतिरिक्त पनवेल ते कल्याणकडे जाणारी मालगाडी लोको पायलट तृष्णा जोशी, सहायक लोको पायलट सेल्वी नादर आणि गुड्स गार्ड सविता मेहता यांनी चालविली.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी कर्मचाऱ्यांवर अवलंबून महिला पाल्यांना शिवणयंत्र, भुसावळ येथील रेल्वे शाळेतील महिला विद्यार्थ्यांना सायकल प्रशिक्षण देण्यासाठी सायकली आणि संगणक प्रशिक्षण व हलके मोटर वाहन चालविण्याचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सभागृहात स्टाफ बेनिफिट फंड आणि रेल परिवार देख-रेख मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरित केले. महाव्यवस्थापकांनी पात्र महिला कर्मचाऱ्यांना पुरस्कारही प्रदान केले. याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांना सांगितले.

यावेळी मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ)च्या अध्यक्षा रैली मित्तल, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभॉय, मध्य रेल्वे; मुख्यालय आणि मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

.................