Join us

महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे, ही चांगली सुरुवात; मनीषा कायंदे यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:33 PM

मनीषा कायंदे यांनी आजही ठाकरे गटावर टीका केली.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे वारंवार ठाकरे गटावर निशाणा साधत आहे. 

मनीषा कायंदे यांनी आजही ठाकरे गटावर टीका केली. ठाकरेंच्या शिवसेनेची ठिकठिकाणी बेअब्रु व्हायला लागली ते मला आवडलं नाही. विधानपरिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासाठी छातीचा कोट करुन भांडले. जेव्हा नवनीत राणा, कंगना रणौत हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत होत्या, तेव्हा आम्हीच त्याक्षणी ठामपणे उभे राहिलो, असं मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

मी आधीही शिवसेनेतच होते आणि शिवसेनेतच प्रवेश केला आहे. २०१२ मध्ये शिवसेनेत आले आणि अजूनही शिवसेनेतच आहे. पक्षाने खुप मोठी जवाबदारी दिली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सचिव केले आहे. महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे. ही एक चांगली सुरुवात आहे, असं मनीषा कायंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

दरम्यान, मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे. 

सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावार दावा केल्यास अंबादास दानवे यांचं पद जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान विधान परिषदेत ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांच्या या विधानावर आता काँग्रेसचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनी निशाणा साधला आहे. 

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरचं विधान परिषदेतील संख्याबळ पुढील प्रमाणे आहे.

भाजपा- २२ठाकरे गट- ०९शिंदे गट- ०२राष्ट्रवादी काँग्रेस- ०९काँग्रेस- ०८अपक्षइतर- ०७एकूण रिक्त जागा- २१

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार