महिलेला एक नागरिक म्हणून केंद्रस्थानी मानून तिचा सन्मान व्हायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:22+5:302021-03-08T04:07:22+5:30
मुंबई : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात ...
मुंबई : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात येते. आज विविध क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून स्वतःला सिद्ध करत आहेत. परंतु देशात आजही काही ठिकाणी महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. महिला सक्षमीकरण हा शब्द विविध सरकारी कार्यक्रमांमधून ऐकण्यास मिळतो, मात्र खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना काय वाटते हे जाणून घेणे गरजेचे आहे. महिला दिन नेमका कसा साजरा केला जावा किंवा महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना नेमके काय वाटते याबद्दल ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.
श्रुती क्षीरसागर (सामाजिक कार्यकर्त्या) : सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेला जेंडर बजेट मागच्या वर्षी वापरला गेला नाही. महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षणाचे प्रश्न याकडे सरकारने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आज महिला विविध सरकारी यंत्रणांच्या शिकार होत आहेत. त्यामुळे महिलांच्या बाबतीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही कायम आहे. महिलेला एक नागरिक म्हणून समाजाच्या केंद्रस्थानी मानले पाहिजे. सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवायला हव्यात. महिला सक्षमीकरण हा शब्द नेहमी उच्चारला जातो, मात्र तशी कृती प्रत्यक्षात होत नाही. महिला सक्षमीकरण करताना तिच्या कुटुंबाचादेखील विचार व्हायला हवा. बऱ्याच महिलांच्या सक्षमीकरणामागे पुरुष खंबीरपणे उभे असतात. पुरुषांच्या सहकार्यामुळे त्या आव्हानांना सामोरे जाऊन यश मिळवतात. अशा पुरुषांचासुद्धा सत्कार करायला हवा. यामुळे समाजातील इतर पुरुष प्रोत्साहित होतील आणि एक सकारात्मक बदल घडेल.
रेश्मा खातू (मूर्तिकार) : समाजात आज स्त्री-पुरुष समानता आहे असे आपण दरवेळी म्हणतो. त्यामुळे आता महिला दिन साजरा करण्याची कोणतीच गरज नसल्याचे मला वाटते. आज बऱ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. तर काही क्षेत्रांमध्ये महिलांशिवाय दुसरा पर्याय नाही. आज अनेक अवघड वाटणाऱ्या गोष्टी हाताळण्यात महिला अग्रेसर आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे आता जागतिक महिला दिन साजरा करण्याचे दिवस निघून गेले आहेत. आता वर्षातील ३६५ दिवस हे महिलांचे आहेत. त्याचप्रमाणे समाजानेदेखील प्रत्येक दिवशी स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान व आदर करायला हवा हाच खऱ्या अर्थाने महिला दिन ठरेल.
सुनीता डोके (शिक्षिका) : आज देशात कुठेही महिला सुरक्षित नाही. आजच्या महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. फक्त प्रत्येक महिलेने ती ओळखण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणाबरोबर मैदानी खेळ खेळायला पाठवा. मुलींना स्वतःचे संरक्षण करता येईल असे प्रशिक्षण द्या. आपल्या मुलींना अंधश्रद्धेपासून दूर ठेवा तसेच त्यांना लहानपणापासून कर्तबगार महिलांचा इतिहास वाचायला द्या. इतिहास वाचल्याने मुली प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतील. तेव्हाच महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला जाईल.
स्वाती मोरे (योग प्रशिक्षक) : प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. यामुळे त्या स्त्रीला अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येक स्त्रीने नोकरी व घर अशा दोन्ही बाजू सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. आपला आहार पद्धतशीर घेऊन झोप वेळेवर घेतली पाहिजे.
कुठे बाहेर व्यायाम करण्याकरिता जाता आले नाही तरी कमीत कमी घरी योगासने करायला हवीत. महिलेचे आरोग्य सुदृढ असल्यास ती समाजात बदल घडवेल.
स्वानंदी तांबे (सामाजिक कार्यकर्त्या) : आजच्या महिलांना माता जिजाऊ, महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्यांनी हिंदू कोड बिल मांडून संविधानात महिलांना समान अधिकार प्राप्त करून दिले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. महिलांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कित्येक महिलांवर कुटुंब व समाजाकडून राजरोसपणे अन्याय केला जात आहे. आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. तळागाळातील महिलांना समाजाकडून सन्मान मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. आणि महिला दिनाचे उद्दिष्टदेखील साध्य होईल.
- श्रुती क्षीरसागर (सामाजिक कार्यकर्त्या)
रेश्मा खातू (मूर्तिकार)
सुनीता डोके (शिक्षिका)
स्वाती मोरे (योग प्रशिक्षक)
स्वानंदी तांबे (सामाजिक कार्यकर्त्या)