मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. बचतगटाच्या या चळवळीत आपला विकास साधतानाच महिलांनी आता उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे. आर्थिक समृद्धी आता फक्त मुंबईसारख्या महानगरांमध्येच मयार्दीत न राहता ती गावागावातील गोरगरीब महिलांच्या घरातही पोहोचली पाहिजे, अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर देशभरातील बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांचे ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात महाराष्ट्रासह २९ राज्यातील बचतगट सहभागी झाले असून हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असेल.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, एखाद्या कंपनीच्या उत्पादनापेक्षा बचतगटांनी तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनात आपुलकीची भावना सामावलेली असते. त्यामुळेच बचतगटांच्या महिलांनी तयार केलेले रागीचे बिस्कीट खाताना आईने बनविलेला पदार्थ खात असल्याचा आनंद मिळतो. बचतगटांच्या महिला मेहनतीने आणि प्रामाणिकपणे उत्पादनांची निर्मिती करतात. यापुढे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात महिला बचतगटांनी तयार केलेली उत्पादने वापरण्यात यावीत अशा सूचना देण्यात येतील, असेही कोश्यारी यांनी सांगितले.
तर, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, महिला बचतगटांद्वारे उत्पादीत वस्तुंचा दर्जा चांगला असतो. कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक त्यात नसते, त्यामुळे लोकही विश्वासाने या वस्तू खरेदी करतात. बचतगट चळवळीचे हे फार मोठे बलस्थान आहे, असे त्यांनी सांगितले. तर, उमेद अभियानांतर्गत राज्यात आतापर्यत ४.२३ लाख बचतगटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून ४५ लाख कुटुंबे अभियानाशी जोडली गेली आहेत. अभियानांतर्गत १०.८३ लाख कुटुंबांनी उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले असून त्या माध्यमातून जवळपास १ हजार ७० कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण झाले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या कार्यक्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह देशभरातील बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणा-या बचतगटांना राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.