मुंबई : महिला मानसिक तणावाच्या शिकार होत असल्याचे, महाराष्टÑ राज्य महिला आयोगाकडे महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे. वृद्धापकाळात मुलांकडून होणारे दुर्लक्ष, पतीची संशयी नजर, प्रियकराने लग्नास दिलेला नकार, अशी अनेक कारणे या तणावास कारणीभूत ठरत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, या तक्रारींचे निरसन करण्यासाठी कायदेशीर मदत करणाऱ्या महिला आयोगाने आता या महिलांना तणावातून बाहेर काढण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन करण्यात येत आहे. एकूण तक्रारींपैकी २५ ते ३० टक्के तक्रारींतील महिलांना समुपदेशनाची गरज भासत असल्याचे महिला आयोगाने स्पष्ट केले.कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणाºया आणि त्यामुळे निराश झालेल्या महिलांच्या मदत व मार्गदर्शनसाठी आयोगाने काही महिन्यांपूर्वीच ‘सुहिता’ या नावाची समुपदेशन हेल्पलाइनही कार्यान्वित केली आहे. आयोगाकडे तक्रार निवारणासाठी येणाºया तक्रारींमध्ये मुलाकडून दुर्लक्ष होत असलेल्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका प्रकरणात, खासगी बँकेत उच्च पदावर असलेला मुलगा आपल्याकडे अजिबात लक्ष देत नसून केवळ सुनेसोबत वेळ घालवतो, अशी तक्रार एका वृद्ध महिलेने केली आहे. विशेष म्हणजे, केवळ आयोगाकडे तक्रार करून ती थांबली नाही, तर तिने मुलाच्या कामावरील वरिष्ठ अधिकाºयाकडेही तक्रार केल्याने त्याची नोकरी धोक्यात आली. मुलगा व सून दोन्हीही कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर असल्याने, घराकडे पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. घरातील सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे, याकडे मुलाने लक्ष वेधले आहे. मात्र, आई प्रचंड तणावाखाली आली होती. त्यामुळे आता तिला मानसिक आधार देण्यासाठी व तिची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन सुरू करण्यात आल्याचे महिला आयोगाने सांगितले.सध्या डॉ. सागर मुंदडा हे मानसोपचार तज्ज्ञ दर शुक्रवारी आयोगाच्या कार्यालयात जाऊन, अशा महिलांवर मानसिक उपचार करत आहेत.सामाजिक जबाबदारी म्हणून ही जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. मुळात, ज्यांना मानसिक उपचारांची गरज असते, त्यांना आपल्याला या उपचारांची गरज आहे, हेच अनेकदा मान्य नसते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना अधिक अडचणी येतात, असे मुंदडा म्हणाले.दीड वर्षांपासून प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराने प्रेयसीला अचानक लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. आयोगामध्ये येणाºया तक्रारींपैकी मानसिक उपचारांची गरज असलेल्या प्रकरणात आम्ही अगोदर समुपदेशन करतो व त्यानंतर आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार सुरू करतो, असे मुंदडा म्हणाले.प्रियकराने लग्नास नकार दिला किंवा पत्नी दुसºया कोणत्याही पुरुषासोबत बोलली, तरी पतीकडून प्रमाणापेक्षा जास्त संशय घेणे, अशा अनेक प्रकारांमुळे महिला तणावाखाली येत आहेत. पॉर्न व्हिडीओ पाहून त्याप्रकारे विविध प्रकारचे लैंगिक कृत्य करण्यासाठीही पतीकडून पत्नीवर दबाव येत असल्याचे प्रकार वाढीस लागले असून, अशा प्रकरणांमध्ये पत्नीकडून तक्रार करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. दर सहा जोडप्यांमध्ये सरासरी एक प्रकरण असे समोर येत असल्याची माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली. समाजातील वाढत्या तणावामुळे त्याचा कौटुंबिक स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या कामाचे बदलते स्वरूप व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे महिलांवरील ताण वाढला आहे. पर्यायाने नैराश्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे अशा वेळी मनावर उपचार करणे गरजचे असते. त्यासाठीच अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर, या महिलांचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याचे आम्ही ठरविले. आमच्याकडे दाखल होणाºया एकूण तक्रारींपैकी मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन आवश्यक असलेल्या महिलांचे प्रमाण २५ ते ३० टक्के इतके असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
महिला मानसिक तणावाच्या शिकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:57 AM