महिला पोलिसाच्या हाताचा घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:18 AM2017-12-27T02:18:57+5:302017-12-27T02:19:32+5:30
मुंबई : सांताक्रूझ परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाईदरम्यान एका महिला पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेण्यात आला.
मुंबई : सांताक्रूझ परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाईदरम्यान एका महिला पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेण्यात आला. हा प्रकार मंगळवारी घडला असून स्थानिकांना चिथवल्याप्रकरणी बी.के.सी. पोलिसांनी एका महिला पत्रकाराला अटक केली आहे.
सांताक्रुझ पूर्वेच्या हंस भुग्रा रोडवर असलेल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून हातोडा मारण्याचे काम सुरू होते. ज्यामुळे चिडलेल्या स्थानिकांनी पोलीस आणि पालिका अधिकाºयांना धक्काबुक्की सुरू केली. या वेळी एक महिला पत्रकार या सगळ्याचे छायाचित्रण करीत होती; ज्याला पालिका आणि पोलिसांनी विरोध केला. एका महिला पोलीस अधिकाºयाने तिच्याकडे तिचे ओळखपत्र मागितले. ज्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याच दरम्यान या महिला पत्रकाराने स्थानिकांना भडकविले. तेव्हा जमावातील एकाने पोलीस शिपाई स्वाती तोडकर यांच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे पोलिसांनी महिला पत्रकाराला पोलीस ठाण्यात नेत तिची विचारणा केली. त्यावेळी फ्रीलान्सर असून ओळखपत्र नसल्याचे तिने सांगितले. मात्र स्थानिकांना भडकवल्याप्रकरणी पोलिसांनी या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल केला.
>कांदिवलीतही महिला पोलिसाला धक्काबुक्की
कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात बुद्ध विहार कार्यालयाजवळ दोन गटांमध्ये जागेवरून वाद होता. त्यानुसार त्यांच्यात मंगळवारी आपसात वादावादी झाली. जी नंतर धक्काबुक्कीत बदलली. कांदिवली पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे हा हंगामा झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी एका महिला पोलिसाच्या हातावर ब्लेडने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ‘महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्या असून या प्रकरणी चौकशी करीत आहोत,’ असे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.