मुंबईतील महिला प्रवासी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:55 AM2017-07-18T02:55:31+5:302017-07-18T02:55:31+5:30
शहराची लाइफ लाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये आणि स्थानकात महिला प्रवासी असुरक्षितच आहे. स्थानकासह लोकलमधील सुरक्षा ही रेल्वे पोलीस आणि रेल्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहराची लाइफ लाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये आणि स्थानकात महिला प्रवासी असुरक्षितच आहे. स्थानकासह लोकलमधील सुरक्षा ही रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल या यंत्रणेकडे आहे. मात्र, या यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, मुंबईतील महिला प्रवासी असुरक्षितच आहेत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
गत आठवड्यात लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चित्रा वाघ यांनी लोहमार्ग आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेतली. त्याचबरोबर मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी महिलांवरील वाढत्या हल्लांसंबंधी वाघ यांनी चर्चा केली.
शहरातील लोकल आणि स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. स्थानकावरील एक्स-रे मशिन, मेटल डिटेक्टर हे आॅपरेट करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मात्र, त्यांचे मॉनिटरिंग करण्यासाठी यंत्रणेकडे मनुष्यबळ नसल्याची धक्कादायक माहिती वाघ यांनी दिली. त्यामुळे लोकल आणि स्थानकातील महिला प्रवासी असुरक्षित आहे. त्याचबरोबर, स्थानकांवरील वाय-फाय सेवेमुळे काही तरुण स्थानकांवर ठाण मांडून बसतात, अशा तरुणांना धाक असणे गरजेचे आहे.
शिवाय स्थानकांवर गर्दुल्ल्यांचा वावर जास्त असल्याने, कोणत्याही प्रवाशांवर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजकंटकांना रेल्वे पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा आरोप वाघ यांनी केला.
आॅगस्टमध्ये नवी हेल्पलाइन
रेल्वे पोलिसांच्या वतीने महिला प्रवाशांसाठी आपत्कालीन समयी हेल्पलाइन सुरू केली होती. मात्र, सद्यस्थितीत ती हेल्पलाइन बंद आहे. या संबंधी रेल्वे पोलीस आयुक्तांना विचारले असता, १ आॅगस्टपासून नवीन ‘चार आकडी’ नंबर असलेली हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
महिला प्रवाशांसाठी २०० विशेष गार्ड
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २०० गार्ड मागविण्यात आले आहेत. शासनाने महिला सुरक्षिततेसाठी ते मंजूर केले असून, टप्याटप्प्याने ते गार्ड दाखल होणार आहेत. ५० गार्डची नेमणूक महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आली आहे. उर्वरित गार्डदेखील लवकरच येणार आहेत. उपलब्ध मनुष्यबळासह महिला प्रवाशांच्या सुरक्षेविषयी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
- निकेत कौशिक, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलीस