- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मकरसंक्रांत हा सण समस्त महिलावर्गासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण आहे. या दिवशी महिला तयार होतात आणि एकमेकींना घरी जाऊन हळदीकुंकवाला येण्याचे आमंत्रण देतात. सौभाग्याचे लेणे असलेल्या विविध गोष्टी वाण म्हणून देण्याची प्रथा आहे.याच प्रथेला जोड देऊन सामाजिक भान जपत वर्सोव्याचा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून दिला आहे. महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या डॉ. भारती लव्हेकर यांच्या ' ती फाऊंडेशन ' द्वारे सॅनिटरी पॅड बँक सुविधेचा लाभ घेणाऱ्या सुमारे १ लाख महिला सदस्य आहेत. वर्सोव्यातील समस्त महिला वर्गासाठी वर्सोवा मेट्रो ग्राऊंड येथे आयोजिलेल्या 'हळदीकुंकू समारंभात चक्क' महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाण देऊन त्यांची ही मोहीम अधिक व्यापक केली.
मकरसंक्रांतीमध्ये हळदी कुंकू लावून सुवासिनींच्या रूपात घरीआलेल्या आदिशक्तीची पूजा केली जाते. हळद व कुंकू लावूनसुवासानीनं मधील दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते. मात्र आपण काहीतरी वेगळे वाण दयावे व हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून समाजामध्ये मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडचा वापर करावा हा संदेश दूरवर पोहोचावा हा डॉ. भारती लव्हेकर यांचा उद्देश होता. मासिक पाळीदरम्यान कपड्याऐवजी सॅनिटरी पॅडचा वापर करावा हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. प्रत्येक महिलेला १० सॅनिटरी पॅड्स, पवित्र अशा तुळशीचे रोप, सौभाग्याचे प्रतीक म्हणून बांगड्या, तिळगुळ, हळदीकुंकू लावून स्त्रियांचा सन्मान केला. कार्यक्रमाला उपस्थित महिलांच्या मनोरंजनासाठी नृत्य तसेच गाण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. उपस्थित महिलांनी ऊत्स्फूर्तपणे गाण्यांवर ठेका धरत नृत्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची मजा लुटली.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सॅनिटरी नॅपकिनचे वाण मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या महिलांनी आमदार डॉ.लव्हेकर यांचे आभार मानले. यावेळी वार्ड क्रमांक ६० चे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर आणि वॉर्ड क्रमांक ६३ च्या नगरसेविका रंजना पाटील, माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्गोपचार तज्ज्ञ जान्हवी मिस्किन-कांबळे यांनी मासिक पाळीच्या काळात कशा प्रकारे काळजी घ्यावी यावरील एक चित्रफीतही दाखवून महिलांचे प्रबोधन केले.
आमदार डॉ.लव्हेकर यांच्या डॉटर्स ऑफ वर्सोवा' या मोहिमेअंतर्गत वर्सोव्यामधील 8 शाळा, कॉलेज 2 पोलीस स्टेशन्स आणि के पश्चिम पालिका विभाग कार्यालयातही त्यांनी मोफत सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोझल मशिन्स बसविल्या असून वयात येणाऱ्या मुलींना मॅनस्ट्रुअल हेल्थ किट तर महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो.