लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत ‘वुमन वॉरियर्स’ ऑन ड्युटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:42+5:302021-06-01T04:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लहान मुलांना घरी ठेवून मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावताना दिसत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लहान मुलांना घरी ठेवून मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी महिला पोलिसांनी त्यांच्या मुलांना गावी नातेवाइकांकडे ठेवले आहे. केवळ व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यात संवाद सुरू असतो.
स्वतःच्या कुटुंबीयांकडे पाठ करत पोलीस ऑन ड्युटी २४ तास कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवेत असल्याने पोलिसांना घरबसल्या काम करण्याची मुभा नाही. विविध जबाबदारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. यात महिला पोलिसांच्या खांद्यावरचा ताण सर्वाधिक वाढला. राज्य पोलीस दलात २० टक्के महिला पोलीस कर्मचारी काम करतात. अशात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांपैकी अनेक जणी वाशिंद, बदलापूर, टिटवाळा, कल्याण, डोंबिवलीसह लांबून येतात. सुरुवातीला लोकलचा एकमेव पर्याय असलेल्यांना शासनाने नेमून दिलेल्या बसेसशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यादेखील ठरावीक वेळेत असल्याने त्याचाही त्रास होताच. त्यात गर्दीमुळे कोरोनाची भीती. अशा विविध अडचणींमुळे अखेर स्वतःच्या खिशाला चाट देऊन अनेक जणी ॲक्टिवावरून वाशिंद ते मुंबई प्रवास करीत आहेत. काहींनी तर आपल्या मुलांना आई तसेच नातेवाइकांकडे ठेवले आहे.
* मुलाला घरात एकटे ठेवून दोघेही कर्तव्यावर
नवरा-बायको दोघेही पोलीस खात्यात आहेत. या दाम्पत्याला एकुलता एक मुलगा आहे. त्याला घरात ठेवून हे दाम्पत्य सेवा बजावत आहे. महिला अंमलदार सांगतात, मुलगा सुखरूप राहावा या विचाराने त्याच्यापासून लांब राहायचे ठरवले. दिवसभर व्हिडिओ कॉलवरून मुलाशी संवाद साधते. रात्री घरी जाताच ओढीने बिलगण्यासाठी आलेल्या मुलाला लांब ठेवावे लागते. जेवणही लांब बसून, अंथरूनही वेगळे असते. आता तोही वैतागला आहे. मात्र कर्तव्यापुढे काहीही नाही, हेच त्यालाही समजावण्याचा प्रयत्न करतो.
* मुले झोपली की घर गाठते
घरी दोन मुली. आधी कामाच्या व्यस्त गराड्यात कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. अशात कोरोनाने आयुष्यच बदलले. त्यात संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांवर संकट असल्यामुळे खाकीतील आई म्हणून काळजी वाटते. आपल्यामुळे त्यांना बाधा नको म्हणून ती झोपली की घर गाठते. हे दिवसही लवकर जातील आणि आम्हीही आमच्या मुलांना घट्ट मिठी मारून जवळ घेऊ, असे एका उपनिरीक्षक महिला पोलिसाने सांगितले.
* कोरोनाच्या भीतीने मुलाला गावी ठेवले
आम्ही दोघेही पोलीस खात्यात आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलाला गावी ठेवले. लाट ओसरत आल्यानंतर त्याला घरी आणले. मात्र दुसऱ्या लाटेत पुन्हा गावी पाठवले. सध्या फक्त व्हिडिओ कॉलचा आधार असल्याचे वाहतूक विभागात काम करणाऱ्या महिला पोलीस शिपायाने सांगितले.
* ८ तास ड्युटीसाठी पुढाकार घेणे गरजेचे
बंदोबस्तामुळे पोलिसांना १२ ते १४ तास नोकरी करावी लागते आहे. त्यामुळे ८ तास नोकरीची बसवलेली घडी पुन्हा विस्कटली आहे. कुणाच्या घरात आजारी व्यक्ती आहे, कुठे लहान बाळ आहे. किमान अशांना थाेडा आधार मिळावा म्हणून ८ तास सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी काही महिला पोलिसांनी केली.
...............................................................