मीरारोड - रेल्वे लोकलच्या डब्यात लागलेल्या कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी कॉल करा अश्या जाहिरातीद्वारे एका महिलेची दमदाटीने ४ लाख ३४ हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या शांतिपार्क मध्ये राहणाऱ्या शालीनी सिंग (२४) ह्या अंधेरी येथे एका बँकेत काम करतात. त्यांचे लग्न रेल्वे पोलीस कर्मचारी राहुल भोईटे रा. यशवंत गौरव, नालासोपारा यांच्याशी वर्षभरा पूर्वी झाले आहे. पतीसोबतच्या कौटुंबिक वादामुळे शालिनी ह्या माहेरी राहतात व अधूनमधून सासरी जात असतात. आपले कौटुंबिक वाद संपून चांगले वैवाहिक आयुष्य जगता यावे म्हणून त्या प्रयत्नशील असल्याने कामावर जात असताना लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात त्यांना चिटकवलेली जाहिरात दिसली.
त्यावर घरगुती वाद असले तर आम्हाला फोन करा, आम्ही त्या वादाचे निवारण करु असे लिहीलेले होते आणि मोबाईल क्रमांक होता. शालिनी यांनी त्याचा फोटो काढून दोन-तिन दिवसा नंतर त्या क्रमांकावर कॉल केला. त्यावर समोरुन एका पुरुषाने विचारणा केल्यावर तिने घरातील कौटुंबिक समस्या सांगीतली. त्या इसमाने कौटुंबिक समस्याचे निवारण करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. पण इतकी रक्कम देण्यास त्यांनी नकार देत कॉल कट केला.
परंतु त्या इसमाने पुन्हा कॉल करून फक्त ४ हजार ७०० रुपये लागतील व ते पैसे गुगल पे करा सांगितले. शालिनी यांनी त्यास होकार देत पैसे पाठवले. नंतर मात्र त्या इसमाने आणखी पैश्यांची मागणी करत त्यांच्या फेसबुकवर असलेले व्यक्तिगत व कुटुंबाचे फोटो मिळवून शालिनी याना व्हॉट्सएपवर पाठवत पैसे दिले नाहीत तर तुझ्या नातेवाईकांचे वाईट करेन असे धमकावू लागला. अश्या प्रकारे धमकावून त्याने बँक खात्यामार्फत ४ लाख ३४ हजार रुपये उकळले. त्याच्या खात्यावरून मंजूर चौहान असे नाव असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी १५ जानेवारी रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.