Join us

हाजी अली दर्ग्यात महिला प्रवेश करणार

By admin | Published: January 29, 2016 2:14 AM

अहमदनगर येथील शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून आंदोलन सुरू असतानाच, आत्ता मुंबईतील हाजी अली दर्ग्यातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी

मुंबई : अहमदनगर येथील शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून आंदोलन सुरू असतानाच, आत्ता मुंबईतील हाजी अली दर्ग्यातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाने पुढाकार घेऊन हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळवून दिला नाही, तर ८ मार्च अर्थात ‘महिला दिना’पर्यंत महिला स्वत:हून दर्ग्यात प्रवेश करतील, असा इशारा वाघिणी संघटनेच्या नेत्या ज्योती बडेकर यांनी दिला आहे.शनी चौथरा असो वा हाजी अली दर्गा, प्रत्येक धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, वाघिणी, सूफी विचार मंच, गांधी-फुले-आंबेडकर विचार मंच, मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी आणि इतर समाजवादी संघटनांनी गुरुवारी दुपारी आझाद मैदानात निदर्शने केली. शासनाने पुढाकार घेऊन सर्व धार्मिक स्थळी महिलांना सन्मानपूर्वक प्रवेश देण्याची काळजी घ्यावी, अन्यथा महिला जमेल त्या स्थितीत धार्मिक स्थळी प्रवेश करतील, असा इशारा बडेकर यांनी दिला आहे.महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळावा, यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावून हाजी अली दर्ग्यावर मोर्चा काढणार असल्याचे फिरोज मिठीबोरवाला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)