...पण महिलांची गैरसोयच होणार
By admin | Published: January 22, 2016 03:18 AM2016-01-22T03:18:07+5:302016-01-22T03:18:07+5:30
गर्दीच्या वेळेत अपघात टाळण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक विविध उपाय केले जात आहेत.
मुंबई : गर्दीच्या वेळेत अपघात टाळण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक विविध उपाय केले जात आहेत. यातीलच एक उपाय म्हणजे, सकाळच्या वेळेस महिला प्रवाशांना सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या तीन एक्स्प्रेसमधून प्रवासास मुभा देण्यात आली आहे, परंतु ही मुभा देताना मध्य रेल्वेने प्रवासासाठी निवडलेली वेळ गर्दीची नसून, कमी गर्दीची असल्याचे समोर आले आहे.
महिला प्रवाशांना ठाणे आणि कल्याण स्टेशनवरून सीएसटीला जाण्यासाठी देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसने प्रवास करता येईल, पंरतु रेल्वेकडून एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची निवडलेली वेळच चुकीची असल्याचा दावा काही रेल्वे अधिकारी करत आहेत. वास्तविक, सकाळी आठ नंतर लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते आणि तीन एक्स्प्रेस या कल्याण, ठाणे स्थानकात सकाळी पावणे सहा ते सात या वेळेत येतात. त्यामुळे या प्रयोगाला महिला प्रवाशांकडून किती प्रतिसाद मिळेल, हे सांगता येणे कठीण असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे एक्स्प्रेसमधून प्रवास करायचा असल्यास महिला प्रवाशांना त्यासाठी कूपन्स विकत घ्यावे लागतील. ही कूपन्स मिळविण्यासाठीही महिला प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर रांगा लावाव्या लागतील आणि प्रवाशांना त्यावर रेल्वेचा स्टॅम्पही घ्यावा लागेल. एवढी कसरत करून या एक्स्प्रेस वेळेवर येतील का, तसेच आल्यास सीएसटीपर्यंत जाण्यासाठी त्यांनाच मार्ग करून देण्यात येईल का, असे अनेक प्रश्न समोर असल्याचे सांगण्यात आले.
या प्रयोगाला २६ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे या प्रयोगाची रेल्वेकडून जय्यत तयारी केली जात असून, कूपन्सही छापण्यात येत आहेत. हा प्रयोग सुरुवातीला तीन महिन्यांसाठी असेल आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.