आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून महिला वकिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:33 AM2019-01-07T02:33:50+5:302019-01-07T02:34:43+5:30
नोव्हेंबर २०१५ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत या दोघींनी ठाण्यातील राममारु ती रोडवरील ‘बीएसएम गोल्ड’ या कंपनीत गुंतवणूक केली होती.
ठाणे : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून बीएसएम गोल्ड अॅण्ड डायमंड नावाच्या गुंतवणूकदार कंपनीने दोन महिला वकिलांनाच गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या काळा चौकी येथील सुप्रिया पवार आणि घाटकोपर येथील अपूर्वा पुजारी या वकिलांनी शनिवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नोव्हेंबर २०१५ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत या दोघींनी ठाण्यातील राममारु ती रोडवरील ‘बीएसएम गोल्ड’ या कंपनीत गुंतवणूक केली होती. कंपनीचे मालक आनंद कोनार आणि व्यवस्थापक अजित सानप यांनी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. प्रतिमहिना दोन हजार रुपये दोन वर्षांसाठी गुंतवल्यास ४८ हजार रुपये होतात. पण, १० हजारांच्या आकर्षक व्याजासहित ५८ हजारांचा परतावा मिळेल. तसेच तीन वर्षांसाठी दोन हजारांची रक्कम गुंतवल्यास ७२ हजारांऐवजी एक लाखाची रक्कम देण्यात येईल, असेही या कंपनीतर्फे सांगण्यात आले. योजना चांगली वाटल्यामुळे सुप्रिया पवार यांनी प्रतिमहिना दोन हजार रुपयांप्रमाणे दोन वर्षांसाठी भरले. पुजारी यांनी एक हजार रुपये प्रतिमहिना तीन वर्षांसाठी भरण्यासाठी अर्ज दिले. मात्र, मुदतठेवची तारीख नोव्हेंबर २०१८ मध्ये असल्यामुळे परताव्याची प्रक्रि या जाणून घेण्यासाठी दोघींनी ठाण्यातील राममारुती रोडवरील मयूर बिल्डिंमधील ‘बीएसएम गोल्डच्या कार्यालयात धाव घेतली. तेव्हा, कंपनीला टाळे ठोकून मालकाने गाशा गुंडाळल्याचे आढळले. तब्बल एक लाख ५६ हजारांची फसवणूक झाल्याने कोनार आणि सानप यांच्याविरु द्ध त्यांनी ५ जानेवारी २०१९ रोजी पोलीस ठाण्यात तक्र ार केली़