महिलांची सिडको कार्यालयावर धडक
By admin | Published: June 10, 2015 10:36 PM2015-06-10T22:36:07+5:302015-06-10T22:36:07+5:30
कळंबोली येथील सेक्टर १२, १३, १४, १५ या परिसरात महिन्याभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार भेडसावणाऱ्या पाणीटंचाईमुळे परिसरातील
तळोजा : कळंबोली येथील सेक्टर १२, १३, १४, १५ या परिसरात महिन्याभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार भेडसावणाऱ्या पाणीटंचाईमुळे परिसरातील महिलावर्ग संतप्त झाला असून बुधवारी याविरोधात सिडको कार्यालयात धडक मोर्चा काढला.
पाणीप्रश्नी कळंबोली सिडको कार्यालयावर महिलांनी धडक दिली. गेल्या महिन्याभरापासून कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा परिसरात होत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी सिडको कार्यालयातील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला.
कळंबोली परिसरात नवनवीन सेक्टर उभारण्याकडे सिडकोचा कल आहे. मात्र १९८७ पासून वसलेल्या वसाहतीतील समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला रस नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील के.एल. १, २, ४, ५, ६ प्रमाणे इतर वसाहतींच्या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. पावसाळ्यात यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून पाणी समस्या सोडविण्याबरोबरच जलवाहिन्या बदलण्याची मागणीही महिलांनी यावेळी केली. (वार्ताहर)