मुंबई : सीएसटी ते कल्याण लोकलच्या महिला डब्यातील प्रवेशद्वार एका गर्दुल्ल्याने अडवून ठेवल्यामुळे रविवारी महिलांचा एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी वारंवार रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करूनही रेल्वे पोलिसांनी दखल न घेतल्याने महिलांच्या संतापात भर पडली.रविवारी सायंकाळी ७.४३ च्या सीएसटी ते कल्याण लोकलमध्ये ही घटना घडली. लोकलमधील महिलांच्या मधल्या डब्याच्या प्रवेशद्वाराजवळ हा गर्दुल्ला ठाण मांडून बसला होता. रविवार असल्याने खरेदीनिमित्त घराबाहेर पडलेल्या गृहिणी, तरुणींची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. अशात या गर्दुल्ल्याने प्रवेशद्वारच अडवून ठेवल्यामुळे महिलांना डब्यातून चढण्या-उतरण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. माटुंगा स्थानकापासून महिलांनी रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास फोन करण्यास सुरुवात केली. मात्र कुर्ल्यापाठोपाठ घाटकोपर स्थानक आले, तरीही पोलीस पोहोचले नाहीत. गर्दीमुळे घाटकोपर, विक्रोळी स्थानकात उतरताना दोन ते तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यामुळे महिलांच्या संतापात भर पडली. अशातच गाडी मुलुंड स्थानकापर्यंत आली तरीही कोणी पोलीस डब्यापर्यंत पोहोचले नसल्याचे प्रवासी नीता देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
महिला डब्ब्यात गर्दुल्ल्याचा धिंगाणा
By admin | Published: November 10, 2015 2:12 AM