Join us

विनाअनुदानित शिक्षिकांचे महिला दिनी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:28 PM

गेले २६ दिवस आंदोलन करीत असलेल्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बंगल्याबाहेर ठाण मांडले.

मुंबई : गेले २६ दिवस आंदोलन करीत असलेल्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बंगल्याबाहेर ठाण मांडले. जागतिक महिला दिन असल्याने शिक्षिकांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शिक्षकांनी पदपथ अडविल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शिवसेना भवनात शनिवारी शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.गेल्या सोमवारी शिक्षकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. त्या वेळी शिवसेना नेत्यांनी आचारसंहितेपूर्वी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले होते. १०४ शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी ४५० शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अद्याप प्रश्न सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याने शिक्षक पुन्हा आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षिकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी आंदोलनाठिकाणी शिक्षकांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले. आश्वासन नको, प्रश्न सोडवा, असे सांगत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. अखेर शनिवारी शिवसेना भवनात बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षकांना देण्यात आले आहे.>शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी आंदोलनाठिकाणी शिक्षकांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले. आश्वासन नको, प्रश्न सोडवा असे सांगत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. अखेर शनिवारी शिवसेना भवनात बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षकांना देण्यात आले आहे. याआधीही या शिक्षकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते़ त्या वेळी तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षकांना देण्यात आले होते़