मुंबई : विकिपीडिया हे सध्या जगातील ३०१ भाषांत उपलब्ध असून, त्यातील इंग्रजी भाषेचा वाचकवर्ग सर्वात मोठा आहे. तब्बल ५.८ लाख लेख आणि विविध विषयांवरील लेखन इंग्रजीत आहे. पुरुष वाचक ५३% तर महिला वाचकांचे प्रमाण केवळ ४७ % आहे. यातीलही फक्त १६% महिला या उपलब्ध लेखनामध्ये किंवा नवीन लेखनामध्ये संपादनात स्वारस्य दाखवित असल्याची माहिती भारतातील विकिमीडियाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली.
जागतिक, तसेच भारतीय स्तरावरील ही दरी मिटविण्यासाठी आणि विकिपीडियावरील संपादनात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी २०१४ पासून भारतातील विकिमीडिया विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती राहुल देशमुख यांनी दिली.याच उपक्रमांचा भाग म्हणजे, जागतिक महिला दिनानिमित्त राबविले जाणारे वुमन एडीथॉन. यंदा भारतीय विकिपीडियाने विकीगॅपद्वारेआणि स्वीडनच्या काउन्सलेट जनरलच्या समन्वयाने आयआयटी मुंबईत या एडीथॉनचे आयोजन केले आहे.
आयआयटी मुंबईतील विविध विभागांतील विद्यार्थी, अधिकारी, प्राचार्य यांना विज्ञानातील महिला, समाजसेवेतील महिला आणि राजकारणातील महिलांवर, तसेच विविध विषयांवर लिहिते करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ६ मार्चला सुरू झालेला हा उपक्रम ९ मार्चपर्यंत चालणार आहे. विकिपीडियावरील महिलांचे हक्क, त्यांचे प्रतिनिधित्व करणे, तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचे कार्य व त्यासाठी आवश्यक स्रोत आणखी मजबूत करणे, यासाठी जगभरात सर्वत्र एडीथॉनद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे.महिला, मुलींना संपादनाची संधीविकीगॅपने हा उपक्रम स्वीडन, व्हिएतनाम, इजिप्त, कोलंबिया, भारत यांसारख्या ६३ देशांत राबविला आहे. यामधून ३० विविध भाषांतील ३५ हजारांहून अधिक संपादित लेखन साहित्य प्राप्त झाले असून, त्याला १६० लाखांहून अधिक वेळा वाचलेही गेले आहे. आयआयटी मुंबई ही भारतातील अग्रणी शैक्षणिक संस्था असल्याने, तरुण महिला, मुलींना स्टेममधील संधी, उपयुक्तता अशा विषयांवर संपादनास मोठी संधी आहे, असे स्वीडन कौन्सल जनरलचे वाणिज्यदूत बिजोर्न हॉल्मग्रेन यांनी सांगितले.
आतापर्यंत जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात महिलांची उत्तम कामगिरी असूनही उल्लेख कुठेही नसतो. विकिपीडिया आणि विकीगॅपच्या साहाय्याने महिलांचे हे उल्लेखनीय काम जगासमोर येण्यास मदत होईल. त्यामुळे या उपक्रमाचा भाग होत असल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स अँड बायोइंजिनीरिंग डिपार्टमेंटच्या (इंटरनॅशनल रिलेशन्स) डीन प्राध्यापिका स्वाती पाटणकर यांनी दिली.