Join us

Women's Day Special: देशातील पहिली महिला ‘चाकांची डॉक्टर’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 1:24 AM

माटुंगा वर्कशॉप । रेल्वेत निरनिराळी कामे केल्यानंतर शिवानी यांना मिळाली टर्नर होण्याची संधी

कुलदीप घायवटमुंबई : रेल्वेची धाव ही चाकांवर अवलंबून असते. या चाकांवर रेल्वेचा प्रवास सुखकर आणि वेगात होतो. या चाकांची देखभाल करण्यासाठी हजारो हात लागलेले असतात. या हजारो हातांमध्ये मुंबईतल्या एका महिलेचाही समावेश आहे. चाकांची दुरुस्ती करण्यासाठी कायम पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या या क्षेत्रात एका महिलेने नाव कोरले आहे. त्या आहेत पहिल्या टर्नर शिवानी कुमार.

१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेल्या माटुंगा वर्कशॉपमध्ये शिवानी कुमार गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहेत. रेल्वे रुळावर धावणारे प्रत्येक रेल्वेचे चाक त्यांच्या हातून दुरुस्त झाले आहे. वारंवार रूळ आणि चाकाचे घर्षण होणे, ब्रेक दाबल्यामुळे चाकांची झीज होणे आणि अन्य कारणांनी चाकांना सूक्ष्म छिद्र पडणे अशा अनेक गोष्टी चाकांबाबत होतात. चाकांचे योग्य कटिंग करून पुन्हा धावण्यासाठी सज्ज करण्याचे काम शिवानी करतात. रेल्वे कोणतीही असो, १८ महिन्यांनी त्यांच्या हातात पुन्हा ते चाक दुरुस्तीसाठी येते. एक्स्प्रेसचे ९१८ मि.मी., लोकलच्या ९५५ मि.मी. व्यासाच्या चाकाचे घर्षण होते. या घर्षण झालेल्या चाकाला पुन्हा ठीकठाक करण्याचे काम शिवानी करतात. अत्यंत बारकाईने रोज कमीतकमी १४ चाकांचे घासकाम करतात. पूर्वी हाताने काम करावे लागत होते. आता आॅटोमॅटिक मशीन आल्याने काम सोपे झाले आहे, असे शिवानी यांनी सांगितले.

देशातील पहिल्या महिला टर्नरपती निधनानंतर १९९० साली शिवानी रेल्वेत खलाशी म्हणून रुजू झाल्या. अडीच वर्षांचा मुलगा, ९ महिन्यांच्या मुलाची जबाबदारी सांभाळत नोकरी करत होत्या.साफसफाई, दगडी कोळसा फोडण्याचे काम कष्टाने करणाऱ्या शिवानी यांची हळूहळू बढती होत गेली. कामातील गती पाहून वरिष्ठांनी टर्नरचे काम करण्याची संधी दिली. त्यामुळे ‘देशातील पहिल्या महिला टर्नर’ म्हणून त्यांचे नाव झाले.

टॅग्स :जागतिक महिला दिनरेल्वे