Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे 

By अजय परचुरे | Published: March 8, 2019 11:34 AM2019-03-08T11:34:43+5:302019-03-08T11:36:59+5:30

वामनला मी सांसारिक जबाबदारीत कधीच गुंतवलं नाही

Women's Day Special: He is a drama, I am their manager : Gauri Kendre | Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे 

Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे 

googlenewsNext

- अजय परचुरे 
मुंबई :  एकेदिवशी माझ्या मोबाईलवर फोन आला. की वामन केंद्रे आहेत का ? आम्हाला एक आनंदाची बातमी सरांना द्यायची आहे. मी म्हटलं बोला. समोरील व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकून मला लहान मुलांगत उड्या माराव्याशा वाटत होत्या. कारण माझ्या नवऱ्याने, माझ्या सरांनी नाटकासाठी दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारचा मानाचा पद्म पुरस्कार जाहीर झाला होता. ह्या आठवणी लोकमतशी बोलत असताना वामन केंद्रे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांच्या डोळ्यात आजही त्यांच्या सरांबद्दलचा असलेला आदर, प्रेम अगदी स्पष्ट झळकताना दिसलं आणि ३५ वर्षांच्या त्यांच्या संसाराच्या कडू गोड आठवणी झरझर तराळल्या. 

गौरी केंद्रेंसाठी आजही वामन केंद्रे हे त्यांचे नाट्यगुरू आहेत. १९८३ साली अकोल्यामध्ये झालेल्या नाट्य कार्यशाळेत गौरीतार्इंना हा पोरसवदा मुलगा आपल्याला नाटक शिकवील याबद्दल जराही खात्री नव्हती. मात्र ह्याच पोरसवदा मुलाने आपल्या एनएसडीमधून शिकून आलेल्या नाट्यविद्येने गौरीतार्इंच्या मनात घर केलं. आणि नंतर त्यांच्याच घरात गौरीतार्इंनी आपलं विश्व उभारलं. आपण एका हुशार मुलाच्या प्रेमात पडलोय आणि आज त्याच माणसाच्या आयुष्यातील आपण एक महत्त्वाचा भाग आहोत ह्याचं गौरी केंद्रेंना भयंकर अप्रूप आहे. वामनला लग्न झाल्यापासून मी भयंकर मोकळीक दिली. कारण हे मला माहीत होतं की हा माणूस नाटक, नाटक आणि नाटक याचसाठी बनला आहे आणि त्यामुळे आज लग्नाला ३५ वर्षे उलटून गेल्यावरही वामनचे नाटक ह्या एका ध्यासापोटी भारत काय जगभर दौरे सुरू आहेत. त्याचे लाखो विद्यार्थी आहेत. पण त्यातील एकमेव लाडकी विद्यार्थिनी मी आहे ह्याचा मला अमिभान वाटतो.

दादरच्या सिंगल रूममध्ये आमच्या संसाराला सुरुवात झाली. तिथपासून आतापर्यंत आम्ही खूप मोठी मजल मारली. वामनला मी सांसारिक जबाबदारीत कधीच गुंतवलं नाही. मी घर पाहते तू नाटक कर ह्या माझ्या विश्वासामुळे आज वामन बीड ते छबिलदास, छबिलदास ते शिवाजी मंदिर, शिवाजी मंदिर ते एनएसडीचं प्रमुख पद आणि आता मानाचा पद्म पुरस्कार हे अनभवू शकला याचं मला प्रचंड कौतुक आहे. एनएसडीचं प्रमुख पद सांभाळायला वामन दिल्लीला ५ वर्षांसाठी जायला निघाला. तेव्हा पहिल्यांदाच वामन इतके दिवस आपल्यापासून लांब राहणार याने काळजात धस्स झालं खरं पण वामनला मोठा पल्ला गाठायचाय ह्यामुळे डोळ्यात पाणी नाही आणलं. माझा नवरा रंगभूमीवर रेकॉर्ड करणारा भारतातला एकमेव दिग्दर्शक आहे. भारतात थिएटर आॅलिम्पिक घडवू शकणारा अवलिया आहे. लाखो नाटक शिकणाऱ्या मुलांचा लाडका सर आहे. अनेक भाषांत नाटक करून दाखविणारा जादूगर आहे हे मला पाहता आलं. 

मला दोन ‘वामन’ मिळाले
आजही मला वामन केंद्रे माझ्या सरांसारखे आहेत. आणि आपण एका हुशार मुलाशी लग्न केलं त्याला त्याच्या आवडीनिवडीमध्ये मदत केली. खंबीरपणे उभी राहिली ह्याचा आनंद वाटतो. आज माझा मुलगा ऋत्विकही अभिनेता आहे आणि त्याच्यातही वामनसारखे गुण आहेत, संयमपणा आहे. त्यामुळे मला एक नाही दोन वामन मिळाले आहेत. ज्यांना मला जपायचं आहे. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी आजही उत्साहाने लहान मुलासारखं आवर्जून जाते. 

संसाररूपी नाटक हाऊसफुल
वामन केंद्रे या माणसाला अजून खूप काही करायचंय. त्याच्या यशस्वी होण्याचा आलेख अजून खूप मोठा आहे आणि त्यासाठी मी एक भिंत बनून त्याच्यामागे उभी आहे. याची त्याला जाणीव असल्यामुळे तो नाटक आहे आणि मी त्याची नाट्यव्यवस्थापक आहे आणि त्याचमुळे आमच्या संसाररूपी नाटकाला नेहमीच हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असतो. ह्या बोर्डाला अजून असंच यशस्वी झळकत राहायचं आहे हीच इच्छा आहे.

Web Title: Women's Day Special: He is a drama, I am their manager : Gauri Kendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.