Women;s Day Special: - मदरहूड की ‘मनहूड’ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:39 AM2020-03-08T11:39:31+5:302020-03-08T11:45:22+5:30
बाहेरच्या जगात ‘ती’ वावरतेय, स्वत:ला सिद्ध करू पाहतेय. त्यामुळे सोशल मीडियाच्या बेगडी चॅलेंजसमधून आणि पोस्ट्समधून ‘स्त्री’चे अस्तित्व सिद्ध करण्याची फूटपट्टी लावताना आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने आपण सर्वांनीच ‘स्त्री’चे मदरहूड सिद्ध करण्यापेक्षा तिचे ‘ह्युमनहूड’ स्वीकारणे अधिक सकारात्मक ठरेल.
स्नेहा मोरे
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचे जग हे समाजाचा आरसा झालाय. रोजच्या संवेदनशील जगापेक्षा कित्येक माणसे या आभासी दुनियेतच जास्त रमताना दिसतात. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर आणि स्नॅपचॅट अशा काही प्लॅटफॉर्मवर ‘सोशली अॅक्टिव्ह’ राहणे ही जिवंतपणाची लक्षणे समजली जातात. याच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘मदरहूड चॅलेंज’ची जोरदार चर्चा आहे. या चॅलेंजमध्ये आईला आपल्या अपत्यासह सोशल मीडियावर फोटो अपलोड करून ओळखीतील काही आयांना पोस्टमध्ये ‘टॅग’ करत आईपण सिद्ध करण्याचे ‘डेअर’ (आव्हान) देतात. मग हा सिलसिला व्हायरल करत प्रत्येक जण आपले आईपण अन् बाईपण सिद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसतोय.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘मदरहूड डेअर’कडे अधिक विचारपूर्वक पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे. काळानुकाळ स्त्रीकडे केवळ एकाच दृष्टिकोनातून पाहणाºया समाजाने तिचे बाईपण-आईपण निवडण्याची मुभा तिला कधीच दिली नाही. याउलट कायमच समाज स्त्रीच्या जगण्याचे ताणेबाणे आपल्यासमोर ठेवत आला आहे. त्यात नाइलाज आहे, अपरिहार्यता आहे, जगण्याचे दु:ख, वेदना, करुणा, माणूस म्हणून वजा होत जाणे आहे आणि मानसिक थकवा, जोडले जाण्याची असोशी आहे. सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळात स्वत:ला व्यक्त करण्याच्या अवकाशाचा अभाव आणि त्या प्रति असंवेदनशील असणारा भवताल स्त्रीच्या जगण्याचा संकोच करतात. कितीही पुस्तके समजून घेतली तरी ‘माणूस’ म्हणून तिचा स्वीकार तिच्या कक्षेबाहेरच राहिला आहे हेच खरे आणि त्यामुळेच पीळ सोडवत जगणे ही बाईच्या जगण्याची अपरिहार्यता आहे. मग तो पीळ आतला असेल, परिस्थितीचा असेल अथवा नात्याचा असेल. सध्या अतिशय व्यामिश्र अशा समकालात स्त्रीकडे, स्त्रीजीवनाकडे आणि ‘माणूस’ म्हणून होणाºया तिच्या प्रवासाकडे कसे पाहतात, हे खूपच महत्त्वाचे आहे.
‘मदरहूड डेअर’ या सोशल मीडियाच्या व्हायरल संकल्पनेविषयी सकारात्मक - नकारात्मक प्रतिक्रिया आहे, त्यात ‘आई-बाई’ या पलीकडे स्त्रीला ‘माणूस’ म्हणून पाहायची गरज स्त्रीवादींकडून व्यक्त होतेय, दुसरीकडे ‘मदरहूड’पेक्षा ‘पॅरेंटहूड (पालकत्व)’ म्हणून या संकल्पनेकडे पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागच्या काही वर्षांत जगण्यासाठी करावयाच्या असंख्य तडजोडींत स्त्रीला आपला आणि काळाचाही चेहरा बदललेला दिसतो. मनातले चेहºयावर आणि वर्तमानात न येऊ देण्याची कसरत करताना आतली उलथापालथ गोठवत नि:शब्द राहण्याची पातळी स्त्रीला कायमच गाठावी लागते. स्त्री म्हणून चार भिंतींतले हे यंत्रवत भासणारे, रटाळ आणि तोचतोपणा यांनी व्यापलेले आयुष्य रेटत राहणे, ही आजही अनेकींच्या जीवनाची वास्तविकता आहे. स्त्रीचे चुलीशी बांधलेले आयुष्य हे युगानुयुगे चालत आलेले असे मानवी समाजाचे वास्तव आहे. मुलगी म्हणून, जोडीदार म्हणून, कुटुंबातली स्त्री म्हणून, समाजाची एक घटक म्हणून स्त्रियांकडे पुरुष कसे पाहतात, त्यांच्याबद्दल काय विचार करतात आणि त्यांना कसे वागवतात, याचे बहुपेडी विचार होणे गरजेचे आहे. पुरुषांच्या मनातली बाई ही कायमच आदर्श आणि परिपूर्ण असते. पुरुषांच्या कल्पनेतली बाई ही नवनवे देह असणारी, न कंटाळता वेगवेगळ्या चवीचा स्वयंपाक करणारी, बºया-वाईट लहरींसह घर नेटके सांभाळणारी आणि गजºयासारखे प्रसन्न दिवस ठेवणारी अशी आहे. हे वर्णन तिच्याकडून असणाºया अपेक्षा आणि तिची तयार केलेली प्रतिमा पुरेशी स्पष्ट करतात. नवा दिवस रोज आपल्या पुढ्यात नवे काही आणून ठेवतोय, ज्यात भरतीच्या लाटेसारखी वाढत गेलेली भीती, असुरक्षितता आणि पडझड आहे. प्रत्येक गोष्टीतून हद्दपार होण्याचे हे दिवस आहेत, याची टोचणी तिला लागून राहते.
स्त्रीला माणूस म्हणून, स्त्री म्हणून, परिस्थिती म्हणून भोगावे लागणारे असे विविध प्रकारचे दु:ख कायमच तिच्या वाट्याला येताना दिसते. जगण्याच्या या घालमेलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे हे ‘बाई’साठी सोपे नाही याची तिला जाणीव आहे. ‘माणूस’ म्हणून अस्तित्व टिकवण्याच्या महामार्गावर नेणारा रस्ता आपण चालू शकत नाही आणि मग शाबूत राहण्यासाठी वळचण महत्त्वाची वाटते. शारीरिक कष्ट, समजूतदार नात्याचा आणि अनुकूल परिस्थितीचा अभाव, नाकारलेपण, तुटलेपण यासह ही दु:खे स्त्रिया सोसतात. त्यातून जगण्यासाठी मार्ग काढताना दिसतात; पण यात कुठेही निराशा नाही, तर परिस्थितीशी झगडणे, प्रसंगी स्वीकार करणे, नमते घेणे, वाट पाहणे आणि प्रयत्न करीत राहणे केवळ तिच्या हातात असते. ‘स्व’चा शोध घेणे ही माणसाची मूळ प्रेरणा राहिली आहे. जगणे अर्थपूर्ण व्हावे म्हणून हा ‘स्व’च्या अवकाशाचा अथक शोध आहे. स्वत:चे असे काही शोधून काढण्याची आस. पण हे कठीण आहे. मातीचा वास येणाºया आतल्या काळोखात स्वत:लाच भेटण्याची एखादी जागा, जिथे स्वत:ला पेरणे आहे आणि पुन्हा उगवून येण्याची वाट पाहणे आहे. बाहेरच्या जगात ती वावरतेय, स्वत:ला सिद्ध करू पाहतेय. त्यामुळे सोशल मीडियाच्या अशा बेगडी चॅलेंजसमधून आणि पोस्ट्समधून ‘स्त्री’चे अस्तित्व सिद्ध करण्याची फूटपट्टी लावताना आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. स्त्री खºया अर्थाने मुक्त झालीय का, हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उभा राहतो.