मुंबई : आजवर गुंतवणूक हा विषय आला की, बहुतांश महिला या ‘आम्हाला त्यातले फार काही कळत नाही अथवा माझे पती, वडील किंवा भाऊ ते सारे बघतात,’ अशा आशयाची उत्तरे द्यायच्या; पण अलीकडच्या काळामध्ये या विषयातही महिलांनी विशेष रस घेण्यास सुरुवात केली असून, अनेक महिला रिअल इस्टेटपासून, शेअर बाजार आणि सोन्यापासून ते म्युच्युअल फंडापर्यंत सर्वच क्षेत्रांत स्वतःहून गुंतवणूक करत असल्याचे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे.
बांधकाम उद्योगातील अग्रगण्य अनारॉक संस्थेच्या सर्वेक्षणातून ही रंजक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार ६५ टक्के महिलांनी त्यांना रिअल इस्टेट अर्थात गृहनिर्माण प्रकल्पांत गुंतवणूक करण्यात प्राधान्याने रस असल्याचे सांगितले. यांपैकी ८३ टक्के महिलांनी ४५ लाख रुपये किंवा त्यावरील घरात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत, तर उर्वरित महिलांनी ९० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या घरात त्यांना रस असल्याचे सांगितले. आठ टक्के महिलांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात रस असल्याचे दिसून आले, तर सात टक्के महिलांना मुदत ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे सोयीचे वाटत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बहुतांश महिला स्वतःचे आर्थिक निर्णय घेताना गुंतवणूक सल्लागाराशी थेट संवाद साधत निर्णय घेत आहेत.
कर्ज घेण्यातही महिलांचा टक्का वाढला
- नोकरी किंवा व्यवसायात असलेल्या महिलांचा कर्ज घेण्यातील टक्का वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून दिसून येते.
- देशात होणाऱ्या एकूण कर्ज वितरणात महिलांचे प्रमाण २६ टक्के असल्याचे दिसून आले.
- गृहकर्ज, गोल्ड लोन, शैक्षणिक कर्ज घेण्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
- वाहनकर्जामध्ये मात्र तितकेसे प्रमाण दिसत नाही.