Join us

डहाणूत पाण्यासाठी महिला कर्जबाजारी

By admin | Published: May 27, 2015 11:01 PM

डहाणू तालुक्यातील चिखले गावाच्या दलित वस्तीतील पाणीप्रश्न सध्या गाजतो आहे. जलस्त्रोतांना पाणी आहे, मात्र गाळ न उपसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे.

बोर्डी : डहाणू तालुक्यातील चिखले गावाच्या दलित वस्तीतील पाणीप्रश्न सध्या गाजतो आहे. जलस्त्रोतांना पाणी आहे, मात्र गाळ न उपसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. परिणामी, तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तर निर्ढावलेल्या प्रशासनामुळे दलित महिलांवर सावकाराकडून कर्ज आणि बँकेत मंगळसूत्र गहाण ठेवून कूपनलिका खोदण्याची वेळ आली आहे.डहाणू तालुक्यातील चिखले गावात पाणीप्रश्न बिकट बनला असून दोन वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनुसूचित जाती-जमातीकरीता पाणीपुरवठ्याच्या विविध योजना आहेत. मात्र ग्रामपंचायत अनभिज्ञ असल्याचे दिसते. वस्तीतील दोन विहिरींमधील गाळ न उपसल्याने पाणी दुर्गंधीयुक्त आहे. दोनपैकी एका कूपनलिकेवर पिण्याच्या पाण्याची भिस्त असून, मचूळ पाणी पिऊन रोगग्रस्त होण्याची भीती आहे. ग्रामस्थ तसेच प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. परंतु, निर्ढावलेल्या प्रशासनाने आश्वासने देऊनही उपाययोजना केल्या नाहीत. अखेर बुरूड काम करणाऱ्या दलित महिलांनी एकत्र येऊन वस्तीत चार कुपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. एक कुपनलिका खोदण्याचा खर्च तीस ते चाळीस हजार आहे. आर्थिक सक्षमता नसल्याने भारती सुरतीने बँकेत मंगळसूत्र गहाण ठेवले आहे. तर दागिन्यांअभावी सावकाराकडे जास्तीचे व्याजदर देऊन पैसे उचलल्याचे नयना सुरती, रतन सुरती, शशी सुरती या महिलांनी सांगितले. या महिलांच्या डोळ्यात अश्रु आणि प्रशासनाबद्दलची चीड आहे. ग्रामपंचायतीने पाने पुसलीच मात्र सभापती, गटविकास अधिकारी यांनीही आपापली जबाबदारी झटकली. डहाणू तहसिलदारांनी देखील या महिलांना प्रत्यक्ष भेट नाकारली आहे. लोकशाहीवरचा विश्वास डळमळला असून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इरादा दलित महिलांनी बोलून दाखवला आहे.राज्यभर जलस्त्रोत आटल्याने तर चिखले दलित वस्तीत प्रशासनाच्या अनभिज्ञतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे कर्ज काढून कुपनलिका खोदल्या जात आहेत. स्त्रीधन विकून शौचालय बांधणाऱ्या महिलेचा ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे मंगळसूत्र देऊन सत्कार करतात. दलित महिलांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या डहाणूतील अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? मंत्री आणि दलित संघटना याप्रश्नी कोणते पाऊल उचलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)चिखले दलित वस्तीतील पाणीप्रश्न प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी चव्हाट्यावर मांडला. मात्र निर्ढावलेल्या प्रशासनामुळे सावकारीपाशात अडकण्याची व दागिने गहाण ठेवण्याची वेळ ओढावली आहे.- योगिता सुरती, पीडित दलित महिलाया वस्तीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.- योगेश महांगडे, गट विकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती ४अखेर बुरूड काम करणाऱ्या दलित महिलांनी एकत्र येऊन वस्तीत चार कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला.