मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात आली. मात्र, ही योजना रेंगाळण्याची चिन्हे आहेत. सीसीटीव्ही बसविणाऱ्या कंपन्यांना लोकलच्या डब्याबाहेरील जाहिरातींचे हक्क मध्य रेल्वेकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जाहिरातींचे हक्क विकून बोओटी तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आहे. मात्र, यास अल्प प्रतिसाद मिळत असल्याने सीसीटीव्ही बसविण्यास उशीर होत असल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करताना महिलांची छेडछाड किंवा हल्ले होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने प्रथम पश्चिम रेल्वेने महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यातही आले. पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेनेही हा निर्णय जाहीर केला आणि सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी सीसीटीव्ही बसविणाऱ्या कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत लोकलच्या महिला डब्यात किंवा डब्याबाहेर जाहिरातींचे अधिकार देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. सुरुवातीला दहा लोकलमधील ५० महिला डब्यात सीसीटीव्ही बसवितानाच पहिली लोकल आॅक्टोबर महिन्यापासून धावू लागली, तर उर्वरीत लोकलमधील महिला डब्यात मार्च २०१६ पर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात येतील, अशी सांगण्यात आले होते, तर अन्य लोकलमध्ये टप्प्याटप्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार होते. सध्या १२१ लोकलपैकी फक्त १४ लोकलवरील जाहिरातींचे हक्क विकले गेले आहेत. उर्वरित १०७ लोकलमधील जाहिरातींचे हक्क विकले न गेल्याने त्या लोकलमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम लांबणीवर गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
महिला डबा सीसीटीव्ही योजना रेंगाळणार
By admin | Published: February 02, 2016 3:51 AM