पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रांवर महिलांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:51 AM2019-03-09T00:51:21+5:302019-03-09T00:51:25+5:30

पारंपरिक जोखड भिरकावून देताना महिलांनी आता पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रातही शिरकाव केला आहे.

Women's flag on men's monopoly workspace | पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रांवर महिलांचा झेंडा

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रांवर महिलांचा झेंडा

Next

मुंबई : पारंपरिक जोखड भिरकावून देताना महिलांनी आता पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कार्यक्षेत्रातही शिरकाव केला आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रोजगार क्षेत्रात आता १२ ते १५ टक्के महिलांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. यात प्रामुख्याने रेल्वे व बसचे चालक, खाण अभियंते, मुख्य व्यवस्थापक, बारटेंडर, डेक कॅडेट, वितरण सहायक, डिस्को जॉकी, सुरक्षारक्षक, ट्रक मेकॅनिक, केशकर्तन आणि खासगी गुप्तहेर यांचा समावेश आहे.
अहवालात म्हटले आहे की, पर्यटन व अतिथ्य क्षेत्रात ४० टक्के महिला आहेत. यात प्रामुख्याने बारटेंडर्स आणि मुख्य व्यवस्थापक म्हणून महिला काम करतात. आयटीसी हॉटेल्सच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांत हॉटेलातील अन्न व पेय विभागातील महिलांचे प्रमाण वाढून ४१ टक्क्यांवर गेले आहे. मनीषा भसीन यांनी दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये उन्हाळी प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला होता. आज त्या हॉटेलच्या मुख्य खानसामा (शेफ) आहेत.
आता ड्रायव्हिंगसारखे पुरुषप्रधान क्षेत्रही महिलांनी काबीज केले आहे. योगिता रघुवंशी यांनी अवजड व्यावसायिक वाहनाच्या चालक म्हणून काम स्वीकारले. त्यांनी सांगितले की, या क्षेत्रात मला रोज २ हजार ते ३ हजार रुपये मिळतात. माझे पती निवर्तले आहेत. मला दोन मुलांचा सांभाळ करायचा आहे.
वस्तू उत्पादन हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे. तथापि, या क्षेत्रातही आता महिलांनी दमदार पाऊल ठेवले
आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे काही प्रकल्प १०० टक्के महिला चालवितात.
>या क्षेत्रांत मात्र कमीच
‘टीमलीज सर्व्हिसेस’ने हे सर्वेक्षण केले. संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, बांधकाम, वस्तू उत्पादन आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात परंपरेने महिलांचे प्रमाण कमी आहे. बांधकाम क्षेत्रात ३५ दशलक्ष लोक काम करतात. त्यात महिलांचे प्रमाण ३० टक्के आहे. तथापि, यात तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदावर महिलांचे प्रतिनिधित्व अवघे १.४ टक्के आहे. स्थापत्य अभियंते, संरचनात्मक अभियंते, विद्युत अभियंते, देखभाल आणि निगराणी कर्मचारी वर्ग या पदावर महिला अभावानेच आढळतात.

Web Title: Women's flag on men's monopoly workspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.