लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पती-पत्नीमधील वादासह महिलांसाठीमुंबई पोलिसांचा महिला अत्याचारविरोधी कक्ष आधार ठरत आहे. आतापर्यंत अनेकांच्या संसाराची विस्कटकेली घडी पुन्हा व्यवस्थित केली आहे. पीडित महिलांना न्याय देण्यासाठी पोलिसांचा महिला अत्याचारविरोधी कक्ष आणि महिला साहाय्य कक्ष कार्यरत आहे. पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज सुरू आहे. ४५ जणांचे पथक येथे कार्यरत आहे. आतापर्यंत शेकडो संसार वाचविण्यास पथकाला यश आले आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उद्योग - धंदे बुडाले. नोकऱ्या गेल्या. तर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. लॉकडाऊन काळात सगळ्यांना आपल्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही तो इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालवला. कुठे संवादामुळे नात्यातला गोडवा वाढला तर कुठे याच एकत्रपणामुळे अनैतिक संबंधांचे बिंग फुटले आणि यातून निर्माण झालेले वाद पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, छोटी छोटी कारणेही वाद होण्यास पुरेशी ठरू लागली. आणि काही ठिकाणी महिलांवरील मानसिक, शारीरिक अत्याचार वाढले. या काळात कक्षाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
ही आहेत कारणेआर्थिक परिस्थिती, मानसिक त्रासासोबतच विवाहबाह्य अनैतिक संबंध, एकत्र कुटुंब पद्धत, सासरच्या मंडळीकडून छळ, हुंड्याची मागणी ही प्रमुख कारणे दिसून येत आहेत.
तडजोडीनंतरही पथकाचा वॉच महिलेची पतीसंदर्भातील लेखी तक्रार येताच, सर्वांत आधी तिची बाजू, परिस्थिती समजून घेतली जाते. पुढे, पती-पत्नीची बाजू ऐकून समजून घेतो. दोघांना विश्वासात घेऊन त्यांना कुटुंब जबाबदारी, मुले, सामाजिक भान यांची माहिती करून त्यांचे समुपदेशन करण्यात येते. ज्या प्रकरणात समुपदेशन करूनही दोघांनाही एकत्र राहायचे नसेल तर अशा वेळी पुढील कारवाईसाठी ती प्रकरणे संबंधितांकडे पाठवली जातात, तर गंभीर प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवितात.