गोरेगाव : नोव्हेंबर महिन्याचा कोकणातील हा काळ म्हणजे जत्रोत्सव. बदलत्या जीवनशैलीमुळे चाकरमान्यांना हा आनंद लुटण्यासाठी गावी जाता येत नाही. म्हणून गोरेगाव येथील नागरी निवारा महिला मंडळाने कोकणच मुंबईत आणले. महिला उद्योजकांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणो, त्याचप्रमाणो कोकणातील उद्योगांना प्रोत्साहन देणो, तेथील खाद्यमेवा, तेथील मनोरंजनाचे प्रकार चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘कोकण महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी कोकण महोत्सवाचे उद्घाटन विश्वस्त गिरीश सामंत व अंजूताई वर्तक यांच्या हस्ते झाले. नवनिर्वाचित आमदार सुनील प्रभू हे या महोत्सवास प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित होते. कोकणातील मालवणी मसाले, खाज्या, खडखडे लाडू, कोकम सरबत, मालवणी जेवण असे 1क् ते 15 प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले. यात बचतगट, महिला गृहउद्योग त्यांच्या विविध वस्तू घेऊन मुंबईत आले आहेत. यात विशेषत: हातसडीचे पोहे, तांदूळ, कुळथाची पिठी, तीन निम्राची सोला (अस्सल कोकम), आगळ (कोकम रस), तिर्फला, भाजका मसाला अशा अस्सल मालवणी पदार्थाची चव मुंबईकरांना अनुभवता आली.
या महोत्सवात केवळ खाद्य संस्कृतीच नव्हे, तर पारंपरिक कलेलाही महत्त्व देण्यात आले. कोकणवासीयांची शान असणारे ‘दशावतारी नाटक’ खास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पाट येथील ‘ओम वीरभद्र नाटय़ मंडळ’ने सादर केले. त्यातील काही जण मुंबईत नोकरीधंदा सांभाळत या पारंपरिक कलेचे जतन करतात. त्यांची वेशभूषा, संवादकौशल्य, नाटय़गीते व त्यांची लढाई बघण्यासाठी आताच्या आधुनिक पिढीनेही गर्दी केली.
भजनी डबलबारी हा प्रकारदेखील लोकांना खिळवून ठेवणारा ठरला. नागरी निवारा महिला मंडळाच्या मागणीनुसार या भजनांमध्ये बदल घडवत सामाजिक भान वाढवणारे स्त्रीभ्रूणहत्या आणि हुंडाबळी असे विषयदेखील मनोरंजनातून लोकांसमोर आणले. या पारंपरिक कलांचे महत्त्व लहान मुलांना कळावे व आवड निर्माण व्हावी म्हणून ‘किलबिल’ हे मुलांसाठी दिवाळी सुटीतील शिबिर घेण्यात आले.
मनोरंजनासोबत नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण निर्माण व्हावी, म्हणून ‘विकासवाटा’ हे चर्चासत्र राबविण्यात आले. त्याचप्रमाणो स्थानिक महिला उद्योजकांना व्यक्त होण्यासाठी ‘स्वयंसिद्ध मैत्रीण’द्वारे व्यासपीठ कोकण महोत्सवात उपलब्ध करून दिले. स्थानिक महिला, पुरुष व मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना ‘स्वयंसिद्ध कलामंच’ उपलब्ध करून केवळ नृत्याला महत्त्व न देता कवितावाचन, नाटय़छटा, गायन, वादन या कलांसाठी उद्युक्त केले गेले.
याच महोत्सवात सुरक्षेची जबाबदारी ही फक्त शासकीय यंत्रणांची नसून सर्व नागरिकांचीदेखील असते. आणि ती कशी घेता येते, यावर पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे याचे संपूर्ण नियोजन केवळ महिला करतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या रोहिणी नाखरेकर, मनीषा भोसले, साधना मालंडकर या सर्व महिलांनी वय विसरून पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी सुंदर पुष्पगुच्छ व भेटवस्तू स्वत: तयार केल्या, असे नागरी निवारा महिला मंडळ अध्यक्षा माधुरी पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)