मुंबई-
मुंबईत रात्री अपरात्री प्रवास करणं देखील सुरक्षित मानलं जातं असं म्हणतात. पण महिलांच्या लोकल प्रवासावेळीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचं दिसून आलं आहे. रात्रीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एक कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण सध्या एका लोकलच्या महिला डब्यात कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याचं भीषण वास्तव महिला प्रवाशानं व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या एका महिलेनं आज रात्री १० वाजताच्या दरम्यान सीएसटी-कल्याण लोकलमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात महिला प्रवाशानं डब्यात सुरक्षेसाठी कॉन्स्टेबल नसल्याचं दाखवलं आहे.
मुंबईत अनेक कंपन्याचं शिफ्टमध्ये काम सुरू असतं. यात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांचीही संख्या अधिक आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रात्री ९ नंतर प्रत्येक लोकलच्या महिला डब्यात एक कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. असं असतानाही सीएसएमटीहून कल्याणकडे निघालेल्या एका लोकलमध्ये महिला डब्यात कॉन्स्टेबल नसल्याचा पुरावाच या महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. तसंच दोन पुरूष यावेळी महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते. पण संबंधित महिलेनं हटकल्यानंतर ते निघून गेले असा दावाही तिनं केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार करुन यावर मध्य रेल्वेनं तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन महिलेनं केलं आहे.