‘आनंदी गोपाळ’च्या प्रेरणेतून साकारले महिला वैद्यकीय महाविद्यालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:43+5:302021-03-08T11:00:52+5:30
राज चिंचणकर ज्याकाळी एखाद्या स्त्रीने उंबरठा ओलांडून बाहेर पडणे समाजमान्य नव्हते; त्याकाळी म्हणजे सन १८८६ मध्ये आनंदीबाई जोशी थेट ...
राज चिंचणकर
ज्याकाळी एखाद्या स्त्रीने उंबरठा ओलांडून बाहेर पडणे समाजमान्य नव्हते; त्याकाळी म्हणजे सन १८८६ मध्ये आनंदीबाई जोशी थेट सातासमुद्रापार जाऊन डॉक्टर झाल्या. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी चित्रपट दोन वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर येऊन गेला. या चित्रपटातून प्रेरणा घेत सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आता पुणे येथे महिला वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली आहे.
चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले, तरी काही चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन संदेश देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यातून काही बोध घेण्यास प्रवृत्त करतात. आनंदीबाई व गोपाळराव जोशी यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडली आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून दिली. ‘आनंदी गोपाळ’ने आता या महाविद्यालयाच्या निमित्ताने स्वतःचे नाव कायमस्वरूपी कोरून ठेवले आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अवहेलना आणि अपमान सहन करत वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा व त्यांचे पती गोपाळराव जोशी यांचा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने इतिहासाच्या पानांतून रुपेरी पडद्यावर मांडला. यातून प्रभावित होत या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव महिला वैद्यकीय महाविद्यालय असून, या महाविद्यालयातून पाच गुणवंत मुलींची निवड करून त्यांना ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती’सुद्धा देण्यात येणार आहे.
अभिमानास्पद गोष्ट...
आमच्या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेले महिला वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे आमच्या संपूर्ण टीमसाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा खूप मोठा पुरस्कार आहे; अशी प्रतिक्रिया या महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत बोलताना या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दिली.