Join us

रक्तदानात महिलांचा सहभाग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:09 AM

मुंबई : रक्तदान करण्यात पुरुष आघाडीवर असून महिला रक्तदान करण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यावर आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

मुंबई : रक्तदान करण्यात पुरुष आघाडीवर असून महिला रक्तदान करण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यावर आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाचे औचित्य साधून पवईतील आयुष्य फाउंडेशन या सामाजिक संघटनेकडून नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळी सायन रुग्णालयातील रक्तपेढीच्या मार्गदर्शनाखाली १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोविड काळात रक्तदानाचे आवाहन सतत करण्यात येत होते. सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर कर्तव्यावर राहून रक्तदान करत होते. मात्र आयुष्य फाउंडेशनने रक्तदान शिबिर आयोजन करून गरजेच्या वेळी मदत झाली. यावर बोलताना आयुष्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितेश वानखेडे यांनी सांगितले की, अशा सामाजिक कामात संस्था नेहमीच सहभाग घेत असते. आताची वेळ रक्तदान शिबिराची असल्याने शिबिर आयोजित केले. यात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त असल्याचे वानखेडे म्हणाले.

रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, यातून कित्येकांना नवीन आयुष्य मिळत आहे. रक्तदानाच्या हाकेला धावून येणाऱ्या पवईतील रक्तदात्यांचे आभार संस्थेकडून मानण्यात आले. यावर बोलताना व्ही. एन. देसाई पालिका रुग्णालय रक्तपेढीचे अधिकारी डॉ. सुमीर डेम्बला म्हणाले की रक्तदान करण्यास महिलांची संख्या वाढत असल्यास स्वागतार्ह आहे. मात्र महिलांमध्ये काही मर्यादा रक्तदान करण्यास आड येत आहेत. रक्तदानात अजूनही पुरुष अधिक संख्येने समोर येत असून काही शारीरिक मर्यादांमुळे महिलांचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यांवर आहे.