पूनम गुरव, नवी मुंबईनोकरी आणि व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणा-या अथवा घरदार नसलेल्या महिलांना नवी मुंबईत आता हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळणार आहे. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी नवी मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटनेने पुढाकार घेतला असून २८ फेब्रुवारीला महिला वसतिगृहाचे उद्घाटन होणार आहे.कोपरखैरणे सेक्टर - १८ मध्ये स्त्रीमुक्ती संघटनेच्यावतीने एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी बहुउद्देशीय इमारतीमध्ये वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. १४०० चौरस मीटर भूखंडावर तीनमजली बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे आणि निवारा केंद्राचे उद्घाटन २८ फेबु्रवारीला होणार आहे. नवी मुंबईत नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. यातच त्या एकट्या या शहरामध्ये राहत असतील तर त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा महिलांची राहण्याची सोय स्त्रीमुक्ती संघटनेने निवारा केंद्राच्या माध्यमातून केली आहे. निवारा केंद्रात महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. नोकरदार महिलांना कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहावे लागते. या वेळेत मुलांची देखभाल आणि त्यांना सांभाळण्याचे काम या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. कचरावेचक महिलांसाठी प्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन देता यावे याकरिता २०० महिलांची आसनव्यवस्था असलेले सभागृह, तीन लहान कॉन्फरस हॉल उभारण्यात आले आहेत. विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका वृषाली मगदूम यांनी दिली. (प्रतिनिधी)
महिलांना हक्काचा निवारा
By admin | Published: February 25, 2015 4:00 AM