Join us  

पोलीस ठाण्यांवर ‘महिला राज’

By admin | Published: March 09, 2016 4:42 AM

महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करण्यात आल्याने मंगळवारी पोलीस ठाण्यात ‘महिला राज’ अवतरले.

मुंबई : महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करण्यात आल्याने मंगळवारी पोलीस ठाण्यात ‘महिला राज’ अवतरले. या पदामुळे मिळालेल्या जबाबदारीच्या कामाबद्दल आणि सन्मानजनक वागणुकीबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र ही स्थिती केवळ एका दिवसासाठी मर्यादित न राहता कायमस्वरूपी राहावी, असे महिला पोलिसांचे म्हणणे आहे. राज्यात सध्या ९ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये आहेत. २ लाख ६ हजारांवर पोलीस विविध आयुक्तालये, विभाग व शाखांमध्ये कार्यरत आहे. त्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या २५ हजार ३११ इतकी आहे. पोलीस ठाण्यातील अंमलदार हे अत्यंत महत्त्वपूर्ण पद असते. हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची नोंद त्यांच्या डायरीत केली जाते. त्याला प्राथमिक माहिती नोंद (एफआयआर) म्हटले जाते. त्यांच्या स्वाक्षरीनिशी नोंद केल्यानंतर त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते. महिला दिनाच्या पार्र्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांतील अंमलदार पदाची ही जबाबदारीची ड्युटी महिलांना देण्यात यावी, असे आदेश महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिल्यामुळे आज राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘महिला राज’ अवतरले. त्यामुळे तक्रारदारांच्याही भुवया उंचावलेल्या पाहावयास मिळाल्या.अनेकांनी ‘आज साहबजी की छुट्टी है क्या,’ असे प्रश्न विचारले. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचा एक वेगळाच दरारा पाहावयास मिळाला. पोलीस शिपायापासून अधिकारीवर्गही एकत्र येऊन काम करत होता. एरवी फक्त बंदोबस्त किंवा छोटी-मोठी कामे करणाऱ्या महिला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेणे, पंचनामा करून एफआयआर दाखल करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली. > संधीचे सोने झाले!नेहमीच पुरुषांच्या बरोबरीने महिला पोलीस काम करतात. आजचा दिवस फारच वेगळा होता. पोलीस ठाण्यात महिलांनी एकत्र येत कामकाज सांभाळले. त्यात आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत काम व्यवस्थित पार पाडण्यावर आम्ही भर दिला. - क्रांती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, एमआरए पोलीस ठाणेआजचा दिवस प्रेरणादायी!आजचा दिवस खरंच प्रेरणादायी ठरला. आत्मविश्वास निर्माण झाला. गुन्ह्यांचा पंचनाम्यासह एफआयआर दाखल करण्याचे काम मिळाले. त्यामुळे आजचा दिवस खूपच प्रेरणादायी ठरला. - जे.एस. देसल, पोलीस शिपाई > आत्मविश्वास वाढला!आज पोलीस उपायुक्तांनी आमची भेट घेत विचारपूस केली. दैनंदिन कामाबरोबर पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची नोंद करून घेण्याची संधी मिळाली. काम करत असताना आत्मविश्वास वाटत होता. त्यामुळे आज महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाल्यासारखे वाटले.- वैष्णवी कोळंबकर, पोलीस अंमलदार, विक्रोळी पोलीस ठाणे