नवी मुंबई : महापालिकेच्या अद्ययावत मुख्यालय इमारतीमध्ये महिला सुरक्षा रक्षकाची कमतरता जाणवू लागली आहे. मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या महिलांना तपासणीकरिता तेथे महिला सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महिला सुरक्षा रक्षक अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.महापालिकेच्या सीबीडी येथील नव्या मुख्यालय इमारतीमध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व काही उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र त्यातही काहीशा त्रुटी असल्याची बाब दिसून येत आहे. मुख्यालय इमारतीची वाढती ख्याती पाहता विविध कारणांनी तेथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये महिला वर्गाचाही समावेश आहे. परंतु मुख्यालयात प्रवेश करतेवेळी या महिलांची तपासणी करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक अथवा कर्मचारीच या ठिकाणी नेमलेले नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजकंटक व्यक्तीकडून महिलेच्या माध्यमातून मुख्यालयात घातक वस्तू सहज नेली जावू शकते. त्यामुळे पालिका मुख्यालय इमारतीमध्ये महिला सुरक्षा रक्षकाची आवश्यकता भासत आहे. हीच बाब ओळखून उषा पाटील, उज्ज्वला यादव आणि कायस्था सावंत या तीन महिलांनी पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची भेट घेतली. यावेळी समाजात सर्व स्तरात आघाडीवर असलेल्या महिलांवर मुख्यालयाच्या सुरक्षेचा देखील भार द्यावा अशा स्वरु पाची मागणी करण्यात आली. यावेळी महिलांच्या माध्यमातूनच निदर्शनास आलेली ही बाब महत्त्वाची असल्याचे मत आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी व्यक्त केले. तसेच तत्काळ पालिका मुख्यालय इमारतीमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षक
By admin | Published: June 16, 2014 3:17 AM